-३-
स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश |
अहं - स्फुरण
स्वत्वाची ओळख, अस्मितेची- पृथकपणाची- जाणीव, अहंकार-जागृति ही संजीवनी आहे. सर्व नवी सृष्टि या अहंकारांतूनच निर्माण होते. भारतांतील प्राचीन तत्त्वज्ञानामध्ये कपिलमहामुनींचें सांख्यदर्शन फार महत्त्वाचे मानले जाते. सांख्यमताने मूलप्रकृतींत बुद्धि निर्माण होते व तींतून प्रथम अहंकाराचे स्फुरण होतें; आणि या स्फुरणांतूनच सर्व चराचर सृष्टि निर्माण होते. मानवी जीवनाचें असेंच आहे. कोणत्याहि राष्ट्राला स्वत्वाची, आपल्या अस्मितेची जाणीव होत नाही तोपर्यंत त्यांत कर्तृत्व निपजत नाही. मूलप्रकृतीच्या ठायीं सुप्तावस्थेंत सर्व गुणसंपदा असते; पण अहंकार- स्फुरणावांचून नवी सृष्टि नाही, त्याचप्रमाणे समाजाच्या ठायीं सर्व प्रकारची गुणसंपदा असूनहि त्याचा पृथगहंकार जागृत झाला नाही, तर तो वैभवास चढत नाही. विष्णुशास्त्री यांच्या आधी बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, दादाभाई, रानडे, फुले यांच्या प्रयत्नाने येथे गुणसंपदा निर्माण होऊं लागली होती, पण अस्मितेंतून जो चित्कळेचा स्पर्श तिला व्हावा लागतो तो अजून झाला नव्हता. त्यामुळे नवनिर्मिति होत नव्हती, कर्तृत्व फुलत नव्हतें, समाजांतून नवे उन्मेष येत नव्हते. विष्णुशास्त्री यांनी तो जीवनदायी स्पर्श घडविला आणि आरंभीं म्हटल्याप्रमाणे येथे नवयुग निर्माण झालें.
आत्मविश्वास
इंग्रज हिंदुस्थानांत आले नसते तर आमचें कांही अहित झालें असतें असें नाही, किंबहुना ते या जगांतच नसते तरी कांही बिघडलें नसतें, असें विष्णुशास्त्री कां म्हणाले ? एक तर त्यांना हें माहीत होतें की, असा एक देश दुसऱ्या देशाचे कधीहि