Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वभाषा, स्वधर्मं, स्वदेश । २१

कल्याण करीत नाही. तो दुसऱ्याला पादाक्रांत करतो तें स्वतःच्या स्वार्थासाठी, जितांच्या रक्तशोषणासाठी; आणि दुसरें म्हणजे आपल्या देशाच्या लोकांमध्ये स्वत्वजागृति झाली, त्यांना आपल्या अस्मितेची ओळख पटली की आपल्या देशाची सर्वांगीण उन्नति करण्यास, त्याचा उत्कर्ष साधण्यास ते स्वतःच पूर्णपणे समर्थ होतील, अशी शास्त्रीबुवांना निश्चिति होती. त्यांच्या लेखनांतून त्यांच्या सुप्त मनाचा ठाव घेतला तर असें दिसेल की, तें मन असेंहि म्हणत होतें- आमच्या पूर्ववैभवाचें आम्हीं स्मरण केलें तर कदाचित् आम्ही इंग्लंडहि पादाक्रांत करूं. 'आमच्या देशाची स्थिति' या प्रबंधांत महादजी शिंदे यांच्या पराक्रमाचा गौरव करतांना त्यांनी लिहिलें आहे.- "वृद्धकथेवरून असें ऐकण्यांत आलें आहे की, पाटीलबोवांचा इरादा खुद्द लंडनवर भगवा झेंडा रोवण्याचा होता." इंग्रजांचें वागणें ख्रिस्ती धर्मास सोडून आहे, असें सांगतांना अन्यत्र त्यांनी विचारलें आहे की, "आम्ही उद्या उठून इंग्लंडवर गेलों आणि सारी दौलत हिंदुस्थानांत भरली तर चालेल काय ? नाना तऱ्हेचे चरक लावून तेथील प्रजा सारी पिळून काढली असतां तें आमच्या पाश्चात्त्य आर्य बंधूंस कितीसें मानवेल बरें ?"
 असला दुर्धर्ष आत्मविश्वास विष्णुशास्त्री यांच्या ठायीं होता; आणि तोच आत्मविश्वास आपल्या हिंदी लोकांच्या ठायीं जागृत करावा, यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लेखणी झिजविली व त्यांना सत्वाची ओळख करून दिली.
स्वत्व म्हणजे काय ?
 शास्त्रीबुवांनी स्वत्वाची ओळख करून दिली म्हणजे काय केलें ? अस्मितेची जाणीव म्हणजे काय ? स्वभाषा, स्वधर्म, आणि स्वदेश यांचा अभिमान हे स्वत्व- स्वदेश या शब्दांत स्वतःची संस्कृति, प्राचीन परंपरा, पूर्वजांचें बहुविध कर्तृत्व त्यांच्या ठायीची गुणसंपदा यांचा अंतर्भाव होतो. आचार्य जावडेकर यांनी म्हटलें आहे की, "१८७५ पासून १८८५ पर्यंतच्या काळांत जें एक नवचैतन्य राष्ट्रांत निर्माण होत होतें त्याला एक सांस्कृतिक अंगहि होते. हें सांस्कृतिक अंग म्हणजे भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचा अभिमान हेंच होय." या अभिमानानेच चैतन्य निर्माण होत असतें. विष्णुशास्त्री यांनी हा अभिमान कसा जागृत केला तें आता पाहूं.
मातृभाषा
 समाजाच्या अस्मितेचें पहिलें अंग म्हणजे भाषा. स्वत्वाच्या दृष्टीने भाषेचें महत्त्व काय तें बांगला देशाने दाखवून दिलें आहे. बांगला हा मुस्लिमांचा देश. त्यांच्या धर्म-ग्रंथाची भाषा आरबी आहे. त्यांचे राष्ट्र म्हणजे पाकिस्तान, त्याची भाषा उर्दू होती; पण बांगला-जनांना त्या भाषा परकीय वाटत होत्या. बंगाली ही त्यांची स्वभाषा. त्यांचें स्वत्व त्या भाषेत होते. त्यामुळे तिच्यावर आक्रमण होतांच तेथले अवघे लोक-जात खवळून उठले आणि पाकिस्तानांतून फुटून निघून आपल्या अस्मितेचें त्याने रक्षण केलें. ही गोष्ट कांही नवीन नाही. सनातन काळापासून