३२८ । केसरीची त्रिमूर्ति
विषयी संताप यावा, चीड यावी, द्वेष निपजावा हाच त्यांचा हेतु असतो; पण लेख लिहितांना ते स्वतः या भावनांच्या अधीन न होतां त्यांना सांगतात की, या अन्यायाचा प्रतिकार माथेफिरूपणाने केला तरी चालेल, याच्याविषयी आम्हांला त्वेष आला पाहिजे, फाशी, हद्दपारी सोसण्याचीहि आपण तयारी ठेविली पाहिजे! या प्रतिपादनांतील भाव अत्यंत जळजळीत व जहरी असा आहे, पण त्यांची भाषा तार्किक प्रतिपादनासारखी आहे. टिळकांच्या गद्य शैलीचा व वक्तृत्वशैलीचा हा फार मोठा विशेष आहे.
गद्य-दृष्टान्त
लालित्य, सौंदर्य, यांची टिळकांना स्वभावतःच फारशी अभिरुचि नव्हती, हें मागे, गायन, नाट्य या कलांविषयीचे त्यांचे उद्गार दिले आहेत, त्यांवरून ध्यानांत येईल. भाषेच्या शृंगाराविषयी त्यांची अशीच दृष्टि होती. उपमा-दृष्टान्त ते देत, पण ते विचार समजावून देण्यापुरते. त्यांतून कांही सौंदर्य निर्माण करावें अशी त्यांची वृत्तीच नव्हती. लोकांच्या बुद्धीला आवाहन करावें, त्यांच्या बुद्धीला पटवून द्यावें एवढेंच उद्दिष्ट त्यांच्यासमोर असे. त्यामुळे पुष्कळ वेळा अध्यात्म, ज्योतिष, वैद्यक या शास्त्रांतले दृष्टान्त ते देत. बादशहा व नोकरशाही यांच्यांत भेद करतांना त्यांनी परब्रह्म आणि माया यांचा दृष्टान्त दिला आहे, हें मागे आलेच आहे. राष्ट्रीयत्वाच्या उदयास प्रारंभ कोठून होतो? राष्ट्रीय अहंकारांतून. सांख्य-मताने सर्व सृष्टीचीच निर्मिति अशी होते. मूलप्रकृतीपासून बुद्धि निर्माण झाली की तींतून पहिलें तत्त्व निर्माण होतें तें म्हणजे अहंकार! राष्ट्राचें असेंच आहे. लॉर्ड कर्झन हें व्हाइसरॉय कसे आहेत? लोकांचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या धूमकेतूसारखे. सूर्यमालेत कांही ग्रह, उपग्रह व कांही धूमकेतूहि असतात. त्याचप्रमाणे बादशहांच्या भोवती फिरणाऱ्या मुत्सद्दी मंडळांतहि कांही धूमकेतु असतात. लॉर्ड कर्झन हे अशांपैकीच एक! श्रीशिवजयंतीसारखे राष्ट्रीय उत्सव हे कांही विशिष्ट हक्क किंवा सद्यःफल मिळविण्यासाठी नसतात. राष्ट्राचें जीवित्व कायम राखण्यासाठी ते करावयाचे असतात. वैद्यकशास्त्रांतील दृष्टान्त घ्यावयाचा झाल्यास असल्या उत्सवांची गणना ताप, खोकला, दमा यांवरील औषधांत न करितां सामान्य आयुर्वर्धक किंवा शक्तिवर्धक उपायांत (टॉनिकांत) करावी लागेल. स्वराज्याची कल्पना आम्ही कांही काळ विसरलों होतों हें खरें पण अग्नीवर राख जमलेली असली तरी आंत विस्तव असतो त्याप्रमाणे स्वराज्याचें आम्हांला सतत मनांत स्मरण असतें. मोर्लेसाहेबांनी देऊ केलेल्या सुधारणा कशा आहेत? टोणग्याच्या आचळासारख्या! सर भालचंद्र चंदावरकर हे सरकारपुढे लाचार होतात याबद्दल त्यांना दोष देण्यांत अर्थ नाही. तो त्यांचा जन्मस्वभाव आहे. कोल्ह्याच्या अंगी धैर्य नाही म्हणून त्याला आपण नांवे ठेवूं काय?