Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाभूतसमाधि । ३२७

स्थानावर परकी राज्य असणेच हितावह आहे" असें सांगून त्यासाठी 'प्रतिनिधिसत्ताक पद्धति' या मिल्लच्या ग्रंथाचा आधार दिला आहे. त्यावर टीका करतांना मूळ ग्रंथांतील अवतरणें देऊन टिळकांनी प्रथम हें दाखवून दिलें की, मोर्ले यांनी मिल्लचीं वाक्यें मागचा-पुढचा संदर्भ सोडून घेतली असून तीं अपुरीं व तुटकी आहेत. आणि मग मिल्लच्या सर्व प्रतिपादनाचा मथितार्थ देऊन म्हटलें आहे की, "मोर्लेसाहेबांनी आपली दिवटी मिल्लसाहेबांच्या मशालीपासून पेटवून घेतली असेल, पण त्यांचे थोर गुण त्यांच्या अंगी नसल्यामुळे, त्या दिवटींतून उजेडापेक्षा धूरच अधिक निघाला आहे." सुरतेच्या काँग्रेसच्या अधिवेशनांत टिळकांनी अध्यक्षांचा उपमर्द केला असा मवाळांनी त्यांच्यावर आरोप केला. त्याला 'अध्यक्षांचे अधिकार' या लेखत्रयींत टिळकांनी उत्तर दिलें आहे. त्यांतला पहिला मुद्दा हा की, पिता काय, गुरु काय किंवा अध्यक्ष काय, ते कल्याण-बुद्धीने वागतात तोपर्यंतच त्यांची प्रतिष्ठा असते. ते जर आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुलाचा, शिष्याचा वा सभाजनांचा घात करूं लागले तर त्यांची अवज्ञा वा उपमर्द करूनच त्यांचा मान राखला पाहिजे. हा मुद्दा मांडून मग टिळकांनी अर्सकिन, में, पालग्रेव्ह, ल्यूसी, डॉ. स्मिथ इत्यादि अनेक पाश्चात्त्य पंडितांच्या आधारे सर्व सभाशास्त्राचें तत्त्वज्ञानच सांगितलें आहे व आपल्यावरच्या आरोपाचें खंडन केलें आहे. 'हिंदी स्वराज्य संघ' या लेखमालेत राज्यशास्त्रांतील अनेक तत्त्वें, हिंदुस्थानचा प्राचीन राज्यकारभार, ब्रिटिश पार्लमेंटांतील रीतिरिवाज, या विषयांचा ऊहापोह करून हिंदुस्थानच्या स्वराज्याची घटना काय स्वरूपाची असावी हें सांगितलें आहे. आणि जातां जातां होमरूलच्या मागणीवर येणाऱ्या आक्षेपांचें साधार, सप्रमाण खंडन केलें आहे. 'हिंदुस्थानांतल्या प्रजेची अस्वस्थता', 'शिवाजी आणि ब्राह्मण', 'राष्ट्रीय शिक्षण' या लेखांत धीरनपाल, मॉरिसन, हिस्टॉरिकस या आक्षेपकांचा टिळकांनी जो परामर्श घेतला आहे त्यांत त्यांच्या बिनतोड युक्तिवादाचीं अशींच आणखी अनेक उदाहरणें सापडतील.
साधी सरळ टीका
 प्रतिपक्षाच्या आक्षेपांचें, आरोपांचें, त्यांच्या सिद्धान्तांचें खंडन करतांना टिळक, विष्णुशास्त्री यांच्याप्रमाणे व्याजोक्ति-वक्रोक्तीचा आश्रय करीत नाहीत किंवा भावनावेगहि प्रकट करीत नाहीत. त्यांच्या लेखणींत हे गुण नाहीत असें नाही, पण ते अपवादात्मक. आधार प्रमाणें व मुद्दे सांगतांना ते प्रतिपक्षावर साधी सरळ टीका करतात. हें म्हणणें एकतर्फी व चुकीचें आहे, हें मत निर्मूल निराधार आहे, अशास्त्रीय आहे, वेडगळ आहे, हें प्रतिपादन असमंजसपणाचें, मानभावी आहे. हें बालिश आहे, पोरकट आहे. अशी त्यांची टीका बहुधा असते. लॉर्ड सँडर्स्ट हे गव्हर्नरपदाला अयोग्य आहेत, नालायक आहेत, असें ते म्हणतात. ते फार रागावले तर 'मुंबईच्या टाइम्सचा हा बेशरमपणा' आहे, लुब्रेपणा आहे, त्याने सर्व आयुष्य श्वान-वृत्तींत घातलें आहे' अशी तीव्र टीका ते करतात. लोकांच्या मनांत इंग्रज सरकार-