Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाभूतसमाधि । ३२३

हायकोर्टाच्या दोन्ही न्यायाधीशांनी मान्य केला, आणि नोकरशाहीविषयी, अप्रीति म्हणजे राजद्रोह होत नाही, असा निकाल दिला. हा सारा टिळकांच्या मुत्सद्देगिरीचा विजय होय.
स्वातंत्र्य अंतिम साध्य
 पण बादशहा व नोकरशाही या भेदापेक्षा आणखी एक निराळा सूक्ष्म भेद त्यांनी १९०७-८ सालीं मांडावयास प्रारंभ केला होता. त्यांत त्यांची खरी प्रज्ञा दिसून येते. त्यांना केवळ साम्राज्यांतील स्वराज्याचाच नव्हे, तर पूर्ण स्वातंत्र्याचा संदेश लोकांना द्यावयाचा होता. तो तर उघड राजद्रोह झाला असता; पण तोहि राजद्रोह नव्हे, हे टिळकांनी स्टेट सेक्रेटरी मोर्ले यांच्या आधारानेच दाखवून दिले. त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ असा की, स्वातंत्र्य हें आमचें अंतिम साध्य आहे. ती आमची अंतिम आकांक्षा आहे; आणि अशी अंतिम वासना कोणती तें सांगणे यांत राजद्रोह नाही. 'फेथ अँड ॲस्पिरेशन्स' हीं पीनल कोडाच्या मर्यादित येत नाहीत, असें खुद्द मोर्लेसाहेबांनीच सांगितले आहे. अंतिम हेतु साध्य करण्याचीं जीं साधनें तीं पीनल कोडाच्या मर्यादेत येतात; पण अंतिम हेतु किंवा उच्च असें अखेरचें प्राप्तव्य लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न हा कायद्यांत येणार नाही. हा महत्त्वाचा भेद आपण लक्षांत ठेवला पाहिजे. सुरत, धुळे व अकोला येथील व्याख्यानांत स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य असे शब्द वापरून त्यांनी पुनः पुन्हा हा भेद स्पष्ट केला आहे. (व्याख्यानें, पृ. ११७, २२३, २४३). अकोल्याच्या व्याख्यानांत तर, ज्याला स्वातंत्र्य हे नैसर्गिक वाटत नाही तो पशु समजावा", असें त्यांनी स्वच्छ म्हटलें आहे.
 बादशहा व नोकरशाही हा भेद आणि अंतिम प्राप्तव्य व तें साध्य करण्याचे मार्ग हा भेद- असे भेद केल्यामुळे टिळकांना अनेक वर्षे राजद्रोहाच्या पकडींत न सापडतां जनजागृति करता आली, लोकांच्यांत निर्भयता व धैर्य जोपासतां आलें व इंग्रज सरकारशी लढा करण्याची सिद्धता करतां आली. १९०८ साली त्यांना शिक्षा झाली त्या वेळीं पूर्ण स्वातंत्र्यासंबंधीचीं सर्व व्याख्यानें सरकारपुढे होती; पण खटल्यांत तीं गोविलीं गेली नव्हती. टिळक अत्याचाराला उत्तेजन देतात यावर सरकारचा सर्व भर होता; आणि ते लेख टिळकांनी लिहिलेले नव्हते. तेव्हा स्वराज्य आणि पूर्ण स्वातंत्र्य यांची प्रेरणा देऊनहि टिळकांनी ती अशा पद्धतीने दिली की, ती राजद्रोहाच्या कक्षेत येऊं नये. त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी ती हीच.
कायदा आणि नीति
 ह्या दोन भेदांप्रमाणेच कायदा व नीति ह्यांत भेद करून टिळकांनी इंग्रजी राज्यामागची सर्व पुण्याईच काढून घेतली. ते म्हणाले की, जें कायदेशीर असतें तें नीतियुक्त असतेच असे नाही. सरकारला आपल्या लहरीप्रमाणे कायदे करतां येतात. औरंगजेब तसेच करीत असे; पण तेवढ्यामुळे त्याचे कायदे जुलमी नव्हते किंवा न्याय्य होते असें ठरत नाही. तसेंच सध्याच्या सरकारचें आहे. त्यांची कृत्ये कायदे