३२२ । केसरीची त्रिमूर्ति
अलौकिक मुत्सद्देगिरी
लो. टिळकांची वृत्ति अशी शांत, धीरगंभीर, दृढ व संथ असल्यामुळे, उत्साह, भावना यांच्या ते कधी आहारी जात नसल्यामुळेच ते फार मोठे राजकीय मुत्सद्दी होऊ शकले. मुत्सद्दी कधीहि भावनावश होत नाही. ध्येयावर त्याची दृष्टि अविचल असली तरी त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. विष्णुशास्त्री यांची निबंधमाला वाचूनच त्यांचे सहकारी होण्याचें टिळकांनी ठरविलें. त्यामुळे प्रारंभापासूनच इंग्रजी राज्याविषयी कडवा द्वेष त्यांच्या चित्तांत असला पाहिजे, हें उघड आहे; पण आरंभीं वीस-पंचवीस वर्षे त्यांनी त्याची वाच्यता केली नाही. इंग्रजी राज्यापासून आमचे खूप फायदे आहेत, तें येथे दीर्घकाल टिकलें पाहिजे, त्याविरुद्ध बंड करणें योग्य नव्हे, आम्ही अत्यंत राजनिष्ठ आहों, असेंच ते म्हणत, सांगत, लिहीत राहिले. मुद्दाम होऊन ते राजनिष्ठा प्रगट करीत असत; पण वंगभंगाच्या चळवळीपासून त्यांची भाषा बदलली. त्या वेळी ते सरकारवर कडक, प्रखर टीका करूं लागले. पण त्या वेळी त्यांनी इंग्रजी बादशहा व नोकरशाही म्हणजे स्टेट सेक्रेटरीपासून साध्या सार्जंटापर्यंतचे अधिकारी हा जो भेद केला त्यांत त्यांची अलौकिक मुत्सद्देगिरी दिसून आली. यामुळे त्यांना सरकारवर वाटेल ती टीका करूनहि हा राजद्रोह नव्हे, ही साधी कारभारी बदलण्याची मागणी आहे, असें म्हणतां आलें. होमरूल लीगच्या स्थापनेनंतर त्यांची बेळगाव व नगर येथे जीं व्याख्यानें झालीं तीं या दृष्टीने वाचण्याजोगी आहेत.
ते म्हणाले, "इंग्रजी राष्ट्राच्या मदतीने, सहानुभूतीने, त्यांच्या देखरेखीखाली आम्हांस आमचें कल्याण करून घ्यावयाचें आहे ही गोष्ट खरी; पण ज्याच्या साहाय्याने ही गोष्ट घडावयाची तें सरकार अव्यक्तच आहे. परब्रह्माहून माया जशी वेगळी तसेंच अव्यक्त सरकारापासून व्यक्त सरकार हे वेगळें असतें. हें व्यक्त सरकार वेळोवेळी पालटतें. अव्यक्त सरकार आम्ही बदलूं इच्छित नाही. पण व्यक्त सरकार बदलावें असें आमचें म्हणणें आहे." अव्यक्त सरकार म्हणजे बादशहा व व्यक्त सरकार म्हणजे नोकरशाही हा भेद पुढे व्याख्यानांत त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केला आहे. "पुन्हा सांगतों की, आमची तक्रार राजा, बादशहा यांच्याबद्दल नाही. मधल्या देवतांविषयी आमची तक्रार आहे... प्रधानाने राजीनामा द्यावा, असें म्हणण्यांत राजद्रोह नाही. होमरूल दिलें म्हणजे इंग्रजांचें राज्य बुडेल असें नाही. ज्या दारांतून आम्ही बाहेर जाऊं म्हणतों तेथे ब्युरॉक्रसी उभी आहे. तिला- त्या नोकरशाहीला- धक्का देऊन आम्हांला बाहेर जाणें आहे." "आम्हांला धनी चालतों, पण मधले कोठावळे (व्हाइसरॉय, गव्हर्नर, कलेक्टर इत्यादि) चालत नाहीत. ते गेले पाहिजेत व त्यांचे अधिकार लोकांना मिळाले पाहिजेत. स्वराज्य मिळविणें म्हणजे इंग्रजी सत्ता किंवा बादशाही काढून टाकणे नव्हे." १९१६ साली टिळकांच्यावर तिसऱ्याने खटला झाला; पण त्यांतून ते निर्दोष म्हणून सुटले त्याचें कारण हेंच. हा भेद