३०६ । केसरीची त्रिमूर्ति
पडेल, असेंहि त्या लेखांत सांगितलें आहे. तेव्हापासून राष्ट्रसभा ही सर्वधर्मीयांची, सर्व जातींची, सर्व पंथांची, सर्व प्रांतांची, सर्व पक्षांची सभा आहे, ती कोणत्याहि विशिष्ट जातिजमातीची नाही, असा त्यांनी सारखा उद्घोष चालविला होता. "या सभेंत, पारशी, मुसलमान आदिकरून सर्व जातींचे लोक राष्ट्रीय प्रश्नांचा विचार करतांना ज्यांनी पाहिले असतील त्यांची, हिंदुस्थानच्या भाग्योदयाचा राष्ट्रसभा म्हणजे पाया आहे, अशी खात्री होऊन त्यांची मनें आनंदाने भरून गेली असतील." असें अकराव्या राष्ट्रीय सभेच्या वेळीं त्यांनी म्हटले असल्याचें मागे सांगितलेच आहे. 'राष्ट्र' या शब्दाची त्यांची व्याख्या तशीच होती. "राष्ट्र म्हणजे एका धर्माचे, एका जातीचे, एका मताचे लोक, अशी व्याख्या नाही. आपलीं भिन्न भिन्न मतें सोडून विशिष्ट हेतूंकरिता लोक एक होतात तेव्हा त्यास राष्ट्र म्हणतात."
तेव्हा प्रारंभापासून लो. टिळकांनी अगदी विशुद्ध राष्ट्रीय वृत्ति अवलंबिली होती; आणि राष्ट्रसभेला तेंच रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न होता हें सहज दिसून येईल. राष्ट्रसभेला– काँग्रेसला- तसें रूप हळूहळू येऊंहि लागले होते; पण खेदाची गोष्ट अशी की, राष्ट्रसभेला असें रूप येऊ लागल्यामुळेच इंग्रज सरकारला ती सभा दुःसह होऊं लागली, ही संघशक्ति पुढेमागे आपल्याला जाचक होईल हें सरकारच्या ध्यानांत आलें, आणि फोडा व झोडा या राजनीतीचा अवलंब करण्याचें त्यांनी ठरविलें. गेल्या शतकांतील हिंदु-मुस्लिम संघर्षाचें मूळ कारण हें आहे.
सरकारची भेदनीति
१८९३ सालीं प्रथम मुंबईला मुस्लिमांचा दंगा सुरू झाला. शेकडो-हजारो मुस्लिमांनी दीन-दीन करीत मशिदींतून, घरांतून, दर्ग्यातून बाहेर पडावयाचें आणि हिंदूंचीं घरे-दारें, दुकानें लुटावयाची, मूर्ति, देवळें फोडावयाचीं व रक्तपात करावयाचा, असा दंगा याचा एकच अर्थ तेव्हापासून आजपर्यंत आहे. त्या सालीं सौराष्ट्रांतील जुनागड या मुस्लिम संस्थानांत प्रभासपट्टण या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांत मुसलमानांनी असा दंगा केला. तेव्हा तेथे ज्या शेकडो हिंदूंचें जीवन उद्ध्वस्त झालें त्यांना साह्य करण्यासाठी मुंबईला हिंदूंची सभा भरली. एवढे निमित्त मुस्लिमांना पुरलें आणि त्यांनी दंग्याला सुरुवात केली. त्यानंतर मग पुणे, येवलें, नाशिक, धुळें, येथे असेच दंगे वरचेवर होऊं लागले. मशिदीवरून जातांना हिंदूंनी वाद्ये वाजविलीं, गाय मारण्यास विरोध केला अशीं कारणें सांगण्यांत येत; पण हीं दाखविण्याची कारणें होतीं. सरकारची भेदनीति हें या सर्वांच्या मागे खरें कारण होतें. त्यामुळे दर वेळी पोलिस मुस्लिमांचा पक्ष घेत, धरपकड फक्त हिंदूंची करीत, त्यांच्यावरच खटले भरीत आणि शिक्षा हिंदूंनाच देत. कारण हिंदुसमाज हा आपला खरा शत्रु असून, त्याला खच्ची करण्यासाठी मुस्लिमांना आपल्या बाजूला वळवून घेणें व त्यांच्यामार्फत हिंदूंचें जीवन उद्ध्वस्त करून टाकणें हें धोरण सरकारने अवलंबिलें होतें.