-९-
हिंदु-मुस्लिम वाद |
लोकमान्यांच्या धार्मिक, राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांतील कार्याचें विवेचन येथवर केलें. आता हिंदु-मुस्लिमवादाविषयीच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श करावयाचा आहे.
भारतांतील हिंदु-मुसलमानांचा संघर्ष बाराशे वर्षांचा जुना आहे. महंमद कासीमने ७११ सालीं सिधप्रांतांत पाऊल टाकले तेव्हाच हा संघर्ष सुरू झाला; आणि आज विसावे शतक संपण्याच्या बेतांत आलें आहे तरी तो संपण्याची चिन्हें दिसत नाहीत. मुसलमान राष्ट्रीय वृत्तीचा स्वीकार करून या भूमीच्या हिताहिताशी जोपर्यंत एकरूप होत नाहीत आणि हिंदु समाज जोपर्यंत आपसांतील जातिभेद वर्णभेद, पंथभेद, प्रांतभेद विसरून संघटित होऊन बलशाली होत नाही तोपर्यंत हा संघर्ष मिटावयाचा नाही, असें आज अनेक पंडित सांगत आहेत. साधारण ऐंशी वर्षांपूर्वी लो. टिळकांनी हाच सिद्धान्त सांगितला होता.
राष्ट्रीय वृत्ति
१८८५ साली राष्ट्रसभेची स्थापना झाली. त्या वेळेपासून राष्ट्र म्हणजे काय व तें कसें घडवावयाचें याची शिकवण टिळक देत होते. "ज्यांना राष्ट्राच्या सुधारणा कशा होतात हें इतिहासवाचनाने कळून आलें असेल त्यांना ही कान्फरन्स (काँग्रेस) भरविणारांस शाबासकी दिल्यावांचून राहवणार नाही", असे उद्गार त्यांनी (८-१२-१८८५) केसरीत काढले आहेत व सर्वं हिंदुस्थानभर एकमेकांच्या साह्याने एकदिलाने, एकोप्याने परिश्रम चालले पाहिजेत; आणि असें झाल्यास 'कलौ संघ शक्तिः' या वाक्याची पूर्तता होऊन आमच्या सुधारणेचें पाऊल जलदीने पुढे
के. त्रि. २०