Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टिळकांचें राष्ट्रीय अर्थशास्त्र । २८७

आपण मँचेस्टरच्या मालावर बहिष्कार घालून, आपल्या उद्योगधंद्यांचें संरक्षण केलें पाहिजे, असें स्वजनांना सांगितलें. (मराठा, १७-३-८१).
 सकृद्दर्शनी टिळकांचें हें प्रतिपादन फार भयंकर दिसतें. गरीब कामगार, त्यांची मुलें व एकंदर जनता यांचे ते शत्रूच आहेत व त्यांची पिळवणूक होणें हेंच त्यांना इष्ट वाटतें, असा त्याचा अर्थ होतो; पण थोडा अर्थशास्त्रीय विचार केला व इतिहास पाहिला तर या आरोपांतील फोलपणा ध्यानांत येतो.
चिचेरोव्हचें मत
 आपण हें ध्यानांत ठेविलें पाहिजे की, कामगारांना सुस्थिति प्राप्त होते ती भांडवलशाहीच्या प्रगतीमुळे होते. भांडवलदारीची वेगाने प्रगति झाली की उत्पादन वाढतें, नफ्याचें प्रमाण वाढतें आणि मग कामगारांना वेतनवाढ देणें शक्य होतें. याच दृष्टीने चिचेरोव्ह या रशियन पंडिताने म्हटलें आहे की, "हिंदी कामगारांचे अति हाल होत, ते भांडवलदारीमुळे नसून, भांडवलदारीची योग्य व व्यवस्थित वाढ न झाल्यामुळे होत, आणि याला कारण म्हणजे ब्रिटिशांचें साम्राज्य." (उक्त ग्रंथ, पृ. ५४९). याविषयी कोणाला शंका असेल तर त्याने रशियाचा क्रांतीनंतरचा पंचवीस वर्षांचा इतिहास पाहवा. कामगारांची सत्ता, त्यांच्या हितासाठी स्थापलेली सत्ता असा तिचा गौरव केला जातो; पण तेथे अजूनहि कामगारांना पुरेसें अन्नहि मिळत नाही. एखादा दिवस कामगार गैरहजर राहिला तर त्याला बडतर्फ केलें जातें; आणि त्याची राहण्याची जागाहि जाते, आणि मग त्याला सैबेरियांत पाठविलें जातें. याचें कारण एकच. तेथे भांडवलदारीची प्रगति अवश्य तितकी झालेली नाही. सर्वांना पुरेसें उत्पादनच तेथे होत नाही. मग विभजन कशाचें करणार?
लॉर्ड रे यांचा सल्ला
 आणि ज्या वेळीं मँचेस्टरवाले व इंग्रज सरकार हिंदी कामगारांची काळजी दाखवीत होते त्या वेळीं म्हणजे १८७५-८० च्या सुमारास इंग्लंडमध्ये कामगारांची काय स्थिति होती? अनेक इंग्रज ग्रंथकारांनीच त्यांची वर्णने केलेलीं आहेत तीं पाहा. म्हणजे हिंदी कारखाने बुडविणें, त्यांच्यामुळे होणारी स्पर्धा नष्ट करणें एवढा एकच हेतु इंग्रज सरकारचा होता हें सहज ध्यानांत येईल. किंवा त्या ग्रंथकारांचीहि गरज नाही. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्वतःच आपला हेतु जाहीर केला आहे. लॉर्ड रे या अधिकाऱ्याने स्वबांधवांना सल्ला दिला की, "त्यांनी हिंदुस्थानांत भांडवल न्यावें, कारण तेथे मजुरी स्वस्त असून, कामगार संघटना मुळीच नाहीत. याचाच अर्थ असा की, तेथे कामगारांचा रक्तशोष किती करावा याला मर्यादा नाही." (लेव्हकॉस्की- उक्त ग्रंथ, पृ. ३१९). व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यानेहि जाहीरपणें सांगितलें होतें की, हिंदुस्थानांत ब्रिटिश कारखानदारीची वाढ करूं देणें हेंच सरकारचें मुख्य उद्दिष्ट आहे. याच वेळीं हुंडणावळीच्या दरांत सरकारने असा बदल केला की, त्यामुळे हिंदी निर्यात मालावर तीस टक्के जकात बसूं लागली. इत्यर्थ