पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मप्रत्यय । १३

कार्य अतिशय जोमाने चाललें पाहिजे; आणि त्यासाठी आपल्या हाती असलेली सर्व सत्ता व अधिकार आपण वापरले पाहिजेत."
सक्तीचा धर्मोपदेश
 रेव्हरेंडसाहेबांचा हा आदेश तंतोतंत पाळण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठरविलें होतें. कंपनीचा प्रत्येक अधिकारी हाताखालच्या काळ्या नोकरांना ख्रिस्ती होण्याकरिता गळ घालीत असे. लष्कर हें तर त्यांच्या हातचें क्षेत्र. तेथे कर्नल, कॅप्टन, लेफ्टनंट इत्यादि सर्व अधिकारी काळ्या सैनिकांच्या पुढे ख्रिश्चन धर्मावर व्याख्यानें झोडीत आणि तीं ऐकण्याची शिपायांना सक्ती असे. हीं व्याख्यानें सभ्य भाषेत असत काय ? लष्करांत सभ्य भाषा वापरणें हेंच असभ्यपणाचें ठरते. हे अधिकारी श्रीरामचंद्र व महंमद पैगंबर यांना अगदी गाळीव शिव्यांची लाखोली वाहत. बंगाल पायदळाचा कमांडर स्वतःच सांगतो की, "मी सतत अठ्ठावीस वर्षं सैन्यांतील शिपायांना ख्रिस्ती करण्याचा उद्योग करीत असून, या मूर्तिपूजक रानटी शिपायांचे आत्मे सैतानापासून सुरक्षित राहतील, अशी व्यवस्था करणें हें आपलें लष्करांतले कर्तव्यच आहे, असें मला वाटतें." अशा कर्तव्यभावनेमुळेच लष्करांत कोणी शिपाई बाटला तर त्याला इतरांचे हक्क डावलून बढती देण्यांत येत असे; आणि या बीभत्स धर्मप्रसाराबद्दल कोणी नापसंती दाखविली तर त्या शिपायाची 'तूप-रोटी' तोडण्यांत येई.
 सैन्यांतल्याप्रमाणे शाळांतहि ख्रिश्चन धर्माचा प्रसार हाच उद्योग चालविला पाहिजे, असा साहेबाचा आग्रह होता. १८३६ साली बंगालमध्ये इंग्रजी शिक्षणाच्या शाळा पहिल्यानेच उघडल्या गेल्या तेव्हा मेकॉलेने असा निर्धाराचा आशावाद प्रगट केला की, पुढील तीस वर्षांत बंगालमध्ये एकहि मूर्तिपूजक नांवालाहि राहणार नाही ! ('सत्तावन्नचें स्वातंत्र्यसमर'- सावरकर, प्रकरण ५ वें).
डलहौसीची प्रतिज्ञा
 पण सत्ताधाऱ्यांना हिंदी लोकांची मानखंडना करण्याचा धर्मांतर हा एकच मार्ग उपलब्ध नव्हता. त्यांना सर्वच मार्ग मोकळे होते. १८४६ सालीं डलहौसी भारतांत आला तो, 'सर्व हिंदुस्थान मी सपाट करून टाकीन' अशी प्रतिज्ञा करीतच आला. आल्याबरोबर प्रथम त्याने पंजाबचा बळी घेतला. नंतर क्रमाने नागपूर, सातारा, अयोध्या हे प्रदेश त्याने सपाट केले. हें करीत असतांना त्याने तेथल्या राजांना केवळ पदच्युत केलें असें नाही. त्याने त्यांचे राजवाडे खणून काढले, वाड्यांतून लष्कर घालून राजस्त्रियांना बाहेर काढले व त्यांच्या अंगावरचे दागिनेहि ओरबडून घेऊन त्यांची शक्य ती बेअब्रू केली. आम्ही जेते आहों व तुम्ही आमचे गुलाम आहां, बूटपुशे आहां, हें दर वेळीं हिंदी लोकांच्या प्रत्ययास आणून देणे हाच यामागचा हेतु होता. इंग्रजांनी रणांगरणांत भारताचा उच्छेद केलाच होता. आता