Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४ । केसरीची त्रिमूर्ति

त्यांच्या मनाचा, स्वत्वाचा, स्वाभिमानाचाहि उच्छेद त्यांना करावयाचा होता. ('कित्ता'- प्रकरण २ रें).
आम्ही जेते
 इ. स. १८७७ च्या जानेवारीत 'कैसर-इ-हिंद' ही पदवी व्हिक्टोरिया राणीने धारण केल्याचा समारंभ दिल्ली येथे दरबार भरवून करण्यांत आला, त्यांतील हेतु हाच होता. आम्ही जेते, तुम्ही जित, आम्ही शास्ते, तुम्ही आमचे गुलाम, आम्ही गोरे साम्राज्यकर्ते, तुम्ही काळे प्रजाजन, हा दिमाख इंग्रजांना दाखवावयाचा होता. हिंदी लोकांची अस्मिता पराभूत करण्याचेंच उद्दिष्ट त्याच्या मागे होतें. विष्णुशास्त्री यांनी अगदी जळफळून त्याविषयी लिहिलें आहे की, "हिंदी प्रजा दुष्काळामुळे मरणाच्या दारी असतांना बीकन्स फील्डसाहेब दिल्लीस दिवा लावीत आहेत. आम्ही राजाधिराज, संस्थानिक हे आमच्या खाली एक पायरी, आणि हिंदी प्रजा ही त्याहूनहि खालची पायरी, हाच काय तो इत्यर्थ. त्या दिवशीं जागजागी कैंसर-इ-हिंदच्या नांवाने खंडोगणती दारू जाळून जे हजारो रुपये खराब केले, त्यांत होता. यापूर्वी सारे लोक मोगलाईस व पेशवाईस नांवें ठेवून इंग्रजी राशियतीची जी तारीफ करीत असत ती स्थिति आता गेली."
 विष्णुशास्त्री यांनी इतकें जळफळून कां लिहिलें ? भारताच्या स्वाभिमानाला झालेला हा डंख त्यांना सहन झाला नाही. देशाची अस्मिता अशी पराभूत झाली तर स्वातंत्र्याची आशा कायमची दुरावेल अशी त्यांना भीति होती. म्हणून त्या मदांध सत्तेवर प्रत्याघात करण्याचें साहस करण्यास ते सिद्ध झाले. हिंदी जनतेच्या स्वत्वाची जपणूक हें त्यांचे एकमेव उद्दिष्ट व कार्य होतें.
आधीचे नेते
 पण यावर प्रश्न असा निर्माण होतो की, विष्णुशास्त्री यांच्या आधीच्या पंचवीस-तीस वर्षांत महाराष्ट्रांत जे थोर पुढारी होऊन गेले त्यांच्या कार्याचें काय ? त्यांनी अशा तऱ्हेचा प्रयत्न केला नव्हता काय ? त्यांना काय स्वाभिमान नव्हता ? या देशांच्या स्वत्वाची त्यांना चिंता नव्हती ? आणि ती जर असेल, तर शास्त्रीबुवांच्या कार्याचें कांही वैशिष्ट्य राहतें काय ?
 या प्रश्नांचा विचार आता करावयाचा आहे.
 शास्त्रीबुवांच्या आधीच्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळांत महाराष्ट्रांत व भारतांतहि अनेक थोर पुढारी होऊन गेले होते; आणि त्यांनी स्वदेशाची चिंता वाहून त्याच्या उद्धारार्थं सर्वांगीण प्रयत्नहि केले होते. महाराष्ट्रांतच दादाभाई नौरोजी, न्या. मु. रानडे, लोकहितवादी व महात्मा फुले यांसारखे कर्ते पुरुष झाले होते; विष्णुशास्त्री यांच्या आधीपासूनच त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला होता. आणि त्यांच्या निधनानंतरहि त्यांचे कार्य चालूच होतें. या थोर नेत्यांनी भारतांत लोकजागृतीचें जें कार्य केलें तें निस्तुळ असेंच आहे. त्यासाठी हिंदुस्थान