Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चित्कळेचा स्पर्श । ११

वैभवावर आघात केला तर यांनी भारतीयांचा सनातन असा जो हिंदु धर्म त्याच्यावर भडिमार केला. प्रत्येक मनुष्याला स्वतःचा धर्म प्राणाहून प्रिय असतो; आणि तो धर्मच हीन आहे, निंद्य आहे, त्यांतील मूलतत्त्वें हास्यास्पद आहेत असें ठरलें, तर त्याच्या आत्म्याचाच लोप होण्याची वेळ येते. त्यामुळे मनुष्याला ठार करणारा त्याचा शत्रु जसा नेमका काळजाचा वेध घेतो त्याचप्रमाणे त्याची अस्मिता नष्ट करणारा शत्रु त्याच्या धर्माचा वेध घेतो. पाश्चात्त्य मिशनऱ्यांनी हेंच केलें.
 भारतांत सोळाव्या शतकापासून ख्रिश्चन मिशनरी येत आहेत. सेंट झेवियर या जेसुइटपंथीय मिशनऱ्याने गोमंतक प्रदेशांत धर्मांतरासाठी केवढे भयानक अत्याचार केले हें प्रसिद्धच आहे. एकोणिसाव्या शतकांत इंग्रजांचें राज्यच येथे प्रस्थापित झाले. तेव्हा मिशनऱ्यांना सर्व रान मोकळेंच झालें. प्रारंभीं इंग्रज सत्ताधाऱ्यांचा मिशनऱ्यांना विरोध होता; पण तो आपल्या सत्तेला धक्का पोचेल या भीतीपोटी. मनांतून त्यांना भारताचें ख्रिश्चनीकरण इष्टच होतें. "सक्तीने धर्मांतर केल्यामुळे ज्याचें कल्याण होईल असा एखादा समाज असेल तर तो हिंदु समाज होय" असें ते म्हणत. मिशनऱ्यांच्या मोहिमेमुळे लवकरच सर्व हिंदु लोक ख्रिश्चन होतील, आणि मग आपले साम्राज्य चिरंतन टिकेल अशी इंग्रज राज्यकर्त्यांना फार आशा होती. म्हणून त्यांनी हळूहळू मिशनऱ्यांना पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलें व सर्वतोपरी साहाय्य केलें.
 ख्रिश्चन मिशनरी शाळा, दवाखाने, वसतिगृहें स्थापीत व त्या मार्गांनी जनतेची सेवा करीत, पण धर्मांतर हाच त्यांचा अंतिम हेतु असे. त्यामुळे या संस्थांतून ते हिंदुधर्म, हिंदु संस्कृति व हिंदु परंपरा यांची निरर्गल निंदा करीत. 'हिंदु धर्म प्रसिद्धीकरण' हें मिशनरी जॉन विल्सन यांचें पुस्तक व 'भगवद्गीतेचें सार' हें रॉबर्ट निज्बिट यांचें पुस्तक म्हणजे मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराचे नमुने आहेत. वस्तुमात्रांत परमेश्वर व्यापून राहिला आहे, असें हिंदु तत्त्वज्ञान सांगतें. त्यावर विल्सनसाहेब म्हणतात की, "असें असेल तर वस्तु फुटली की ईश्वर फुटतो, असें होईल." सर्व जग म्हणजे माया आहे, असें हिंदू म्हणतात. त्यावर साहेब म्हणतात की, "मग देव फसविलेला आहे आणि फसविणारा आहे" असें या हिंदु मतांवरून दिसतें. वाहवा जी वाहवा." जीव हा देवाचा अंश आहे, असें वेदान्त सांगतो. त्यावर निज्बिट साहेब म्हणतात की, "देवाच्या ठायी अज्ञान नाही, तसे जीवाच्या ठायीहि नाही, असें म्हणावें लागेल; पण तें आहे. तेव्हा जीव हा देवाचा तुकडा नाही, असें सिद्ध होतें."
 यावरून हे दिसून येईल की, हिंदूंचा तेजोभंग करून त्यांचें स्वत्व नष्ट करण्याचा जो प्रयत्न इंग्रज पंडितांनी चालविला होता तोच प्रयत्न मिशनऱ्यांनी धर्म-प्रसाराच्या मार्गाने चालविला होता. इंग्रज राज्यकर्ते तर यांत अग्रेसर होते. कसें तें आता पाहू.