Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१० । केसरीची त्रिमूर्ति

आतां येत नाहीत! पण तीं हिंदूनी कोरली असें मान्य केलें तर त्यांच्या अंगीं कर्तृत्व होतें असें सिद्ध होईल ही भिति आहे. म्हणून मग जेम्स मिल्ल या साहेबाने सांगून टाकलें की, तीं स्वयंभूच असली पाहिजेत ! मेकॉलेने तर जाहीर करून टाकले की, हिंदूचे प्राचीन ग्रंथ ज्या कागदांवर लिहिले आहेत त्या कागदाच्या रद्दीइतक्याहि ते योग्यतेचे नाहीत !
पूर्वग्रह
 भारतीयांचे प्राचीन ग्रंथ भाषांतरित आहेत असें सिद्ध करणें हा पाश्चात्त्य विद्वानांचा पहिला मनसुबा तें नच जमले तर ते फार प्राचीन नाहीत, ख्रिस्ती शकाच्या फार मागे ते नेतां येत नाहीत, असें तरी निदान दाखवून द्यावयाचें, हा त्यांचा दुसरा डाव. मॅक्समुल्लर हा भारताचा अभिमानी होता. सर्व जन्म त्याने भारताच्या प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासांत घालविला; पण त्याच्याहि मनांत पूर्वग्रह किती जबर होता तें पाहा. तो म्हणतो, "वालखिल्यसूक्त हें प्रातिशाख्यापेक्षा अलीकडचें आहे असें सिद्ध करतां आलें, तर मला बरें वाटेल, तसेंच प्रातिशाख्यादि ग्रंथ सध्यापेक्षा अलीकडचे आहेत, असें सिद्ध झाल्यास मला समाधान वाटेल. पण तें समाधान मला लाभणार नाही, अशी भीति वाटते." प्राच्यविद्येच्या सर्वश्रेष्ठ पंडिताचे हे उद्गार आहेत. त्यांवरून भारतीयांच्या प्राचीन वैभवावर, त्यांच्या उज्ज्वल परंपरेवर आघात करून त्यांचा तेजोभंग करण्याचा पाश्चात्य पंडितांनी केवढा अट्टाहास चालविला होता हें ध्यानांत येईल.
न्यूनगंड
 अगोदरच रणांगणांत पराभूत झाल्यामुळे भारतीय जन मनाने खचून गेले होते. त्यांच्या ठायीं न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यांतच इंग्रजांची आगगाडी, वाफेचीं जहाजें, तारायंत्रे, नाना प्रकारची इतर कळीचीं इंजिनें हीं डोळ्यासमोर चमत्कारांसारखी दिसूं लागली. त्यांच्या मागच्या विज्ञानाची कांही कल्पना नसल्यामुळे हे लोक दैवी शक्तीने संपन्न आहेत अशी भारतीयांची दृढ भावना झाली. त्यामुळे हे लोक जातितः, वंशतःच आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, असें त्यांना वाटूं लागलें व त्यांच्या ठायीं, कालिदासाच्या दिलीप राजाप्रमाणे, आत्मनि अवज्ञा निर्माण झाली. आपण हीनदीन आहोंत, प्रज्ञा, बुद्धिमत्ता, ज्ञान, विद्वत्ता या बाबतींत त्यांची आपली तुलनाच होणार नाही, असें त्यांच्या मनाने पक्कें घेतलें. त्यांत प्राचीन परंपरा, संस्कृति, इतिहास यांवर जो इंग्रजांनी हल्ला चढविला त्याचाहि प्रतिकार आपल्याला करतां येत नाही, हें ध्यानांत आल्यामुळे हिंदी लोक सर्वस्वी प्रज्ञाहत झाले. त्यांच्या स्वत्वाचा लोप होण्याचा समय आला.
मिशनरी
 भारताचा व भारतीयांचा तेजोभंग करण्याचें व्रत घेणारा दुसरा एक वर्ग म्हणजे पाश्चात्त्य मिशनरी हा होय. पाश्चात्य पडितांनी भारताच्या प्राचीन