Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






चरित्र - रूपरेषा


 लो. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म १८५६ साली रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील गंगाधरपंत हे प्राथमिक शिक्षक होते; पण ते बहुश्रुत असून, त्यांचा संस्कृतचा व्यासंग चांगला होता. त्यांनी मुलाला शाळेत घालण्यापूर्वी त्याचा बराच अभ्यास घरीं करून घेतला होता. १८६६ सालीं त्यांची बदली पुण्यास झाली. टिळकांचें सर्व शिक्षण पुण्यासच झालें. १८७२ च्या डिसेंबरांत ते मॅट्रिक झाले व १८७३ साली डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी नांव घातलें. मॅट्रिक होण्याच्या आधीच्या वर्षीच टिळकांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचें नांव सत्यभामाबाई.
 टिळक १८७७ साली बी. ए. झाले व १८७९ साली एल्एल्. बी. झाले. विष्णुशास्त्री यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेचा संकल्प आधीच जाहीर केला होता. तेव्हा एल्एल्. बी. होतांच टिळक त्यांना जाऊन मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली; आणि टिळक तेथे अध्यापनाचें कार्य करूं लागले. १८८४ साली याच मंडळींनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली; व या संस्थेने १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. तेव्हा टिळक त्या कॉलेजांत प्राध्यापक म्हणून काम करूं लागले. पुढे १८९० साली सोसायटीच्या इतर सभासदांशी टिळकांचा अंगीकृत धोरणाविषयी मतभेद होऊन त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला.
 विष्णुशास्त्री व टिळक, आगरकर, नामजोशी प्रभृति त्यांचे सहकारी ह्यांनी जानेवारी १८८१ मध्ये 'केसरी' व 'मराठा' ही दोन साप्ताहिक वृत्तपत्रे सुरू केली. त्या वेळीं आगरकर केसरीचे व टिळक मराठ्याचे संपादक झाले. पुढे सामाजिक सुधारणेच्या कांही तत्त्वांवरून टिळक व आगरकर यांचा मतभेद होऊन तो विकोपाला गेला; आणि १८८८ साली आगरकरांनी 'सुधारक' हें स्वतंत्र पत्र काढले. आधीच्या वर्षापासूनच टिळक केसरीचे संपादक झाले होते. पुढे १८९० साली सोसायटीचा