Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






-६-

प्राचीन परंपरेचा अभिमान


 आगरकरांनी आपल्या लेखांतून स्वकीय समाजांतील चालीरीति, रूढि, सण, धार्मिक आचार, विधि, जातिभेद, गुणलोप यांवर प्रखर टीका केली आहे; आणि परकीय लोकांची विद्या, त्यांची समाजव्यवस्था, त्यांचा राज्यकारभार यांची विलक्षण स्तुति केली आहे. त्यामुळे त्यांच्यासंबंधी कांही लोकांचा असा गैरसमज झाला होता की, त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल तिरस्कार वाटत होता; पण हा समज खरा नाही. इंग्लिश लोकांची त्यांनी अनेक बाबतींत स्तुति केलेली असली, तरी त्यांच्या राजकीय व आर्थिक धोरणावर त्यांनी कडक टीका केली आहे (हैं आपण वर पाहिलेच आहे); आणि त्यांनी आपल्या प्राचीन परंपरेचा अभिमानहि वारंवार प्रगट केला आहे. समाजाची सुधारणा व्हावी या सद्हेतूनेच त्यांनी सामाजिक दोषांवर टीका केली व इंग्रजांचे गुण गाईले हे आपण ध्यानांत ठेवले पाहिजे.
स्वधर्म
 आगरकरांना स्वधर्माचा विलक्षण अभिमान होता. हिंदु धर्मांत अनेक व्यंगें असली किंवा आमच्या अनेक चालीरीति मूर्खपणाच्या असल्या तरी, आपला धर्म सोडून दुसरा एखादा धर्म स्वीकारणें हें त्यांना मुळीच मान्य नव्हतें. तसें करील तो सुधारकच नव्हे; स्वभूमींत, स्वलोकांत, स्वधर्मांत आणि स्वाचारांत राहून अविचारी व अज्ञान देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भितां, त्यांची सुधारणा करणें यांतच खरी देशप्रीति, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरें शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे, असें त्यांनी म्हटले आहे. हिंदु धर्मातील दोष दाखवून त्यावर ते तीक्ष्ण प्रहार करीत असले तरी, धर्मांतर त्यांनी निंद्यच मानलें होतें. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या थापांना भुलून अतिशूद्र लोक खिस्ती धर्माकडे धांव घेत होते, ही