१९० । केसरीची त्रिमूर्ति
आहेत. इंग्लंडमधील मनुष्याचे सरासरी आयुर्मान ४० वर्षे आहे तर, हिंदी माणसाचें फक्त २३.५ वर्षे. हिंदुस्थानांतील जमीन सुपीक आहे, निसर्गसंपत्ति भरपूर आहे, सर्वांना पुरेसे अन्न येथे उत्पन्न होतें, पण तरीहि लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. त्यामुळे लाखो लोक अकालीं मरून जातात. त्याशिवाय रोगराईला बळी पडणारे लाखों लोक निराळेच. इंग्रजांच्या राज्यांत इतर सुखसोयी व सुधारणा बऱ्याच आल्या. शांतता प्रस्थापित झाली. शिक्षणाचा प्रसार झाला, हें खरें. पण लोकांना अन्नवस्त्र पुरेसें मिळत नसतांना त्या सुधारणांना मुळीच किंमत नाही. तेव्हा इंग्रज राज्यामुळे अखेरीस आमचें काय हित होईल हें सांगणे कठीण आहे, असें आगरकरकरांनी म्हटले आहे.
(२) दारिद्र्याची कारणें - अशा प्रकारे हिंदुस्थानांत जें भयानक दारिद्र्य पसरलें होतें, त्याची कारणमीमांसा आगरकरांनी कांही लेखांत केली आहे. ब्रिटिश सरकारचे जे सनदी व बिनसनदी नोकर हिंदुस्थानचा कारभार पाहत होते, त्यांना मोठाले पगार दिले जात, त्यांच्या राहण्याच्या जागा, त्यांचा प्रवास, त्यांची पेन्शनें, यांसाठीहि अवाढव्य खर्च होत असे. हा सर्व खर्च हिंदुस्थानच्या तिजोरीतून केला जाई. आधीच हिंदुस्थानांतील नोकरशाहीचा कारभार अत्यंत उधळेपणाचा होता आणि त्यांत रुपयाचा भाव खाली आल्यामुळे त्या नोकरवर्गाचें बरेंच नुकसान होऊ लागलें. तेव्हा सर्वांनी आकांडतांडव करून आपला पगार वाढवून घेतला. त्याचा बोजा हिंदुस्थानच्या तिजोरीवरच पडला. तो प्रचंड खर्च भागवण्यासाठी गरीब प्रजेवरील कर वाढवणें एवढाच उपाय सरकारजवळ होता.
हिंदुस्थानांतील दारिद्र्याचें दुसरें कारण म्हणजे इंग्रज लोकांनी इथले उद्योग-धंदे बंद पाडून इंग्लंडमध्ये उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचा मोठा व्यापार इथे सुरू केला हें होय. त्या मार्गे दरवर्षी अमाप संपत्ति हिंदुस्थानांतून इंग्लंडला जात असल्यामुळे इथल्या उद्योगधंद्यांना आणि व्यापाराला पुरेसें भांडवल मिळेनासें झालें. मुसलमानांच्या स्वाऱ्या पूर्वी येऊन गेल्या त्या वेळी त्यांनी जी संपत्ति लुटून नेली तिला काही मर्यादा होती. पुढे मुसलमानी राज्य सुरू झाले तेव्हा ते राज्यकर्ते व सरदार वगैरे सर्व लोक इथेच स्थायिक झाल्यामुळे संपत्तीचा बाहेर जाणारा ओघ थांबला, इथला व्यापार खूप वाढला व देशाची भरभराट झाली. इंग्रजांनी मात्र स्वतःचा व्यापार वाढवण्यासाठी हिंदी लोकांचा व्यापार बुडवला आणि त्यामुळे हिंदुस्थानांत दारिद्र्य वाढले.
दारिद्र्याचे तिसरें कारण म्हणजे ब्रिटिश साम्राज्यासाठी जीं युद्धे चालू होतीं, त्यांचा सगळा खर्च हिंदुस्थानच्या माथीं टाकला जात होता. ब्रह्मदेशाशीं युद्ध, वायव्य सरहद्द प्रांतांतील लढाया, यांचा खर्च भागवण्यासाठी हिंदी प्रजेवर कर वाढवण्यांत आले आणि प्रांतिक सरकारांनी शिक्षणावरील खर्च कमी करून केंद्र-