Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-५-

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा


 सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक इत्यादि सुधारणांचें तौलनिक महत्त्व, त्या सुधारणा घडवून आणण्याचें लोकशिक्षण व कायदा हे मार्ग आणि या संबंधांतून निर्माण होणारे वाद यांविषयी आगरकरांची काय मतें होतीं त्याचें विवरण गेल्या प्रकरणांत केलें. आता या क्षेत्रांत त्यांना काय सुधारणा अपेक्षित होत्या तें पाहवयाचें आहे. सामाजिक सुधारणांवर आगकरांचा सर्व भर होता हें खरेंच आहे, पण सामाजिक रूढींची सर्व पाळेंमुळें धर्मशास्त्रांत असल्यामुळे धार्मिक सुधारणांचाहि त्यांनी तशाच उत्कटतेने पुरस्कार केला आहे. राजकीय सुधारणांच्या बाबतीत आगरकरांच्याविषयी जरा गैरसमज आहेत हें मागे सांगितलेंच आहे. अनेक लेखांत त्यांनी राजकीय सुधारणांचाहि नव्हे, स्वराज्यरूप जी सर्वांत मोठी राजकीय सुधारणा तिचाहि, जोरदार पुरस्कार केला आहे. सामाजिक सुधारणांवर त्यांनी जेवढे लिहिलें त्यामानाने हे लेख संख्येने कमी आहेत एवढेच. असो, या तीनहि क्षेत्रांत त्यांना कोणत्या सुधारणा अपेक्षित होत्या तें आता पाहू.
सामाजिक सुधारणा
 (१) स्त्री-जीवन - आगरकरांच्या मतें राष्ट्राची उन्नति ही त्यांतील समाजाच्या स्थितीवर अवलंबून असते; आणि समाजस्थिति ही गृहस्थितीवर अवलंबून असते. गृहस्थिति म्हणजे कुटुंबांतील व्यक्तींची स्थिति व त्यांचे परस्परसंबंध. ही गृहस्थिति स्त्रीचें कुटुंबांतील स्थान, तिची प्रतिष्ठा, तिचे अधिकार, तिचें स्वातंत्र्य यांवर अवलंबून असते. म्हणूनच आगरकरांनी स्त्री- जीवनसुधारणेला विशेष महत्त्व दिले आहे. जातिभेद, अस्पृश्यता यांविषयी त्यांचीं मतें तशींच तीव्र आहेत; पण