Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुधारणा - अग्रक्रम व मार्ग । १६७

हितावहच ठरला. त्याचप्रमाणे वैवाहिक गुलामगिरी लवकर बंद करण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे.
सक्ती अवश्य
 शिक्षणामुळे लोकांचीं मतें बदलून त्यांनी आपण होऊन आपल्या आचार-विचारांत सुधारणा केल्या तर उत्तमच होय; पण असें बहुधा घडत नाही; कारण सर्वांना योग्य शिक्षण मिळतेंच असें नाही; आणि तसें तें मिळाले तरी देखील लोक स्वयंप्रेरणेने कांहीहि करीत नाहीत. इंग्लंड, फ्रान्स इत्यादि सुधारलेल्या देशांतहि समाजाला इतकी प्रगतावस्था प्राप्त झालेली नाही, असा निष्कर्ष आगरकरांनी काढला आहे. त्या देशांत सुद्धा कोणतीहि सुधारणा लोकांवर सक्ती केल्यावांचून झालेली नाही. अशी सक्ती करणारी सत्ता भिन्न भिन्न प्रकारची असेल; पण तिला इष्ट वाटणाऱ्या गोष्टी जबरदस्तीनेच लोकांच्या गळी उतरवाव्या लागतात. त्यामुळे लोकांवर थोडासा जुलूम झाल्यासारखें दिसतें; पण आगरकर म्हणतात की, जुलूम, सक्ती या शब्दांना घाबरण्याचें कांहीच कारण नाही. बालविवाह, विधवांचे केशवपन, सती या दुष्ट रूढींमुळे स्त्रियांवर जो जुलूम होतो, त्या मानाने सरकारची सक्ती कांहीच नाही. अशी सक्ती केल्यावांचून प्रचलित दुष्ट रूढींचा भयंकर जुलूम थांबणार नाही. कारण लोक निष्क्रिय आहेत. आगरकर म्हणतात, "ज्याने उठावें त्याने शिक्षण सर्वांच्या मुळाशी आहे, स्वप्रचोदित क्रिया अत्यंत कल्याणकारक आहे, सरकारी सक्ती पराकाष्ठेची विघातक आहे असें सांगत सुटावें व हाताने कांही करू नये, अशा प्रकारचा खुळा बाजार सर्वत्र माजला आहे!"
स्पेन्सरचा विपर्यास
 सुशिक्षित लोक स्पेन्सर, मिल्ल वगैरे पाश्चात्त्य पंडितांचे ग्रंथ वाचून प्रभावित होतात आणि त्यांचे विचार व सिद्धान्त आपल्या मताला आधार म्हणून सांगतात. पण या बाबतींत बरेच लोक स्पेन्सरच्या मतांचा विपर्यास करतांना दिसतात. समाजाच्या कोणत्या स्थितींत सरकारकडे कोणत्या प्रकारचा व किती अंमल असावा, याविषयी त्याने आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत; पण समाजाच्या उत्तमावस्थेंत लागू पडणारे सिद्धान्त आपले लोक आपल्या मागासलेल्या समाजाला लागू करतात. "याहून विशेष मूर्खपणाचा भ्रम असणें शक्य आहे काय?" असे उद्गार आगरकरांनी काढले आहेत.
स्वातंत्र्य?
 सामाजिक सुधारणेच्या बाबतींत सरकारी हस्तक्षेपामुळे आमच्या स्वातंत्र्याला बाधा येते, असें म्हणणारे लोक इतर बाबतीत मात्र सरकारच्या विनवण्या करतात; गोवधबंदी, मद्यपानबंदी, धंदेशिक्षण यासाठी सरकारने कायदे करावे, सक्ती करावी, ती चालेल असे लाचारपणें म्हणतात, याची आगरकरांना फार चीड येत असे. ते वचारतात, "सामाजिक सुधारणांविषयी इंग्रज सरकार परकीयत्वामुळे अत्यंत