१५६ । केसरीची त्रिमूर्ति
आगरकर म्हणतात. "जों जो मनुष्यांची सुधारणा होत जाते तों तों त्यांच्या अन्योन्य व्यवहारांतील बलात्काराचें तत्त्व लयास जाऊन त्याच्या जागीं संमति-तत्त्व प्रस्थापित होतें, व या कारणास्तव येथून पुढे राजा व प्रजा, कुलाधिपति व कुलावयव, पति व पत्नी, मातापितरें व अपत्यें स्वामी व सेवक, गुरु व शिष्य, विक्रेता व ग्राहक यांतील व्यवहार आणि संबंध उत्तरोत्तर बलात्काराने न होतां संमतिपूर्वक होत जाणार आहेत."
मनुष्याचें शरीर व समाज यांच्यांत बरेंच साम्य आढळतें. समाजाला शरीराची व त्यांतील व्यक्तींना अवयवांची उपमा नेहमी दिली जाते. ज्याप्रमाणे शरीराचे निरनिराळे अवयव वेगवेगळी कामे करीत असले तरी, ते एकमेकांवर अवलंबून असतात व एकमेकांना मदत करीत असतात; त्याचप्रमाणे समाजाचे अवयव म्हणजे व्यक्ति एकमेकांवर अवलंबून असतात व एकमेकांना मदत करीत असतात. शरीराचे अवयव असें सहकार्य न करतील तर शरीर व्यापार चालणार नाहीत; तसेच व्यक्तींच्या सहकार्यावांचून समाजव्यवस्था टिकणार नाही, हें खरें आहे.
पण समाज व मानवी शरीर यांच्या रचनेंत फार फरक आहे. समाजांतील प्रत्येक व्यक्तीला मन असतें, वेगळें ज्ञान असतें, संवेदना असते, स्वतःची इच्छा असते. त्यामुळे व्यक्तीला स्वतंत्रपणें सुखदुःखाचा अनुभव घेता येतो. तसें शरीरांतील अवयवांचें नसतें. त्या प्रत्येक अवयवाला वेगळें मन नसतें, व त्यासर्वांचे व्यापार त्या व्यक्तीच्या सुखासाठी चालू असतात. व्यक्तीचें जें सुख तेंच तिच्या अवयवांचें सुख होय; पण समाज हा काल्पनिक पुरुष आहे. म्हणून हें ध्यानांत ठेवले पाहिजे की, समाजाचें कल्याण म्हणजे त्याच्या अवयवांचें, त्यांतील व्यक्तींचें कल्याण होय; तेव्हा समाजाच्या हितासाठी व्यक्तीच्या सुखाचा बळी दिला तरी चालेल असें म्हणणें भ्रामक आहे, कारण व्यक्तींच्या हिताहून निराळें असें समाजाचें हित नसतें.
तथापि बरेच पंडित, समाजाच्या हितासाठी व्यक्तींच्या हिताकडे दुर्लक्ष केलें तरी चालेल, असें मानतात. त्यांच्या म्हणण्याचा खरा भावार्थ असा असतो की, समाजांतील कांही लोकांच्या कल्याणासाठी इतरांच्या हिताकडे दुर्लक्ष करावें लागतें. देशाच्या राजाचें किंवा वरिष्ठ वर्गाचें जें कल्याण तें साऱ्या समाजाचें कल्याण असाहि अर्थ कांही लोक करतात. ज्या समाजांत अशा संकुचित दृष्टीने वर्तन होत असतें, त्यांत एक सत्ताधारी, श्रीमंत वर्ग व दुसरा हीन दीन, दलित वर्ग, अशी विभागणी झालेली असते. ही विषमता नष्ट होऊन सर्वांना शक्य तितकें समान सुख मिळणें हें समाजाच्या सुधारणेचें व प्रगतीचे लक्षण होय. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत बहुतेक व्यवहार बलात्काराने होत असतात; आणि म्हणून त्याच्या सर्व अवयवांस सुखाचा सारखा वांटा मिळत नाही. तो मिळू लागल्यास ते व्यवहार समाजघटकांच्या अन्योन्य संमतीने होऊं लागले पाहिजेत. पाश्चात्त्य जगांत सध्या हें घडूं लागलें आहे. म्हणजेच संमति-तत्त्व प्रस्थापित होऊं लागलें आहे.