मनुष्यसुधारणेची मूलतत्त्वें । १५५
त्याची सत्ता अनियंत्रित असल्यामुळे तो बहुधा फार जुलमी असतो; पण सर्वांनी परस्परांना मारण्यापेक्षा एकाचा जुलूम पत्करला. मनुष्य हा जात्या बलहीन असल्यामुळे, राजाने कितीहि छळ केला तरी तो सोसून समाजांत राहण्यांतच आपले हित आहे, असें त्याला वाटतें; कारण राजा पराक्रमी असतो व तो प्रजेचें संरक्षण करतो.
ज्याच्या अंगीं धैर्य, शौर्य, चातुर्य, इत्यादि गुण असतात तोच राजा होतो. लोक त्याला खूप मान देऊ लागतात व स्वार्थसाधु स्तुतिपाठक त्याला देवच म्हणू लागतात. हळूहळू राजाहि स्वतःला देव मानूं लागतो. तो निरंकुश असल्यामुळे लोक त्याचा जुलूम सहन करतात. त्यामुळे तो अधिकच जुलमी होतो. दुबळी प्रजा त्यांचा प्रतिकार करूं शकत नाही; पण मोठमोठ्या सरदार-कुळांवर जर राजाने जुलम केला व तो असह्य झाला, तर तीं कुळें प्रतिकारास सिद्ध होतात आणि प्रजेच्या मदतीने राजाविरुद्ध उठाव करतात. अशा संघर्षांत सरदारांचा जय झाला, तर राजसत्ता नष्ट होऊन तिच्या जागीं सरदार-कुळांची सत्ता स्थापन होते. कालांतराने हे सरदारहि सत्तेमुळे मदांध होऊन प्रजेवर जुलूम करूं लागतात. तो जुलूम असह्य झाला व लोक संघटित होऊं शकले, तर ते सरदारांची सत्ता नष्ट करून स्वतःची सत्ता स्थापन करतात,
अशा प्रकारे राजसत्ता नष्ट होऊन तिच्या जागीं लोकांची सत्ता प्रस्थापित व्हायची असेल, तर त्यासाठी लोकांच्या ठायीं तेवढें सामर्थ्य असलें पाहिजे. प्रबळ राजसत्ता किंवा सरदारांची सत्ता उलथून टाकण्यांत युरोपांतील लोक यशस्वी झाले आहेत; पण आम्ही हिंदु लोक किंवा मुसलमान, चिनी यांच्यांत तें सामर्थ्य नाही. त्यामुळे जुलूम असह्य झाला की ते थोडीशी धडपड करतात; आणि फिरून गुलामगिरी पत्करतात. अज्ञान, अंधश्रद्धा, तर्कशून्य बंधनें यांमुळे हे समाज दुबळे झाले आहेत. त्यांना पाश्चिमात्य ज्ञानामृत पाजून त्यांच्यांत प्रथम चैतन्य आणलें पाहिजे, अशी आगरकरांची धारणा होती. म्हणून त्या वेळच्या लोकनेत्यांना त्यांनी बजावलें आहे की, "ज्या उपायांनी राजसत्ता लोकांच्या हातीं येईल ते आपण करीत असलों म्हणजे आपले कर्तव्य झालें, असें समजून स्वस्थ बसतां कामा नये; तर ज्या उपायांनी राजसत्ता (स्वराज्य) प्राप्त झाली असतां तिचें संरक्षण व तिचा सदुपयोग करतां येईल, असें शिक्षण त्यांस अगोदर दिलें पाहिजे."
अनियंत्रित राजसत्ता म्हणजे जुलूम, जबरदस्ती, सक्ति. यालाच आगरकरांनी बलात्कार म्हटलें आहे. अशी राजसत्ता जाऊन तिच्या जागीं लोकांची सत्ता येणें याचाच अर्थ बलात्काराकडून संमति तत्त्वाकडे वाटचाल होणें असा आहे. व्यक्ति- स्वातंत्र्य ही याच्याच पुढची पायरी होय.
सामाजिक
सामाजिक व्यवहारांतहि बलात्काराकडून म्हणजे सक्तीच्या तत्त्वाकडून संमति-तत्त्वाकडे मार्गक्रमण चालू आहे. "आमचें काय होणार" या लेखांत