Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनुष्यसुधारणेच मूलतत्त्वें । १५३

पावतात, त्याच उपायांनी व कृतींनी देवताहि आनंद पावत असतील, असा आमचा भरवसा ठरून गेल्यामुळे आमच्यांतील अज्ञ लोकांचा पूजाविधि अत्यंत उपहासास्पद झाला आहे. सांब हा थेट पिशाचवर्गातून देववर्गांत आला असल्यामुळे त्याचें रूप आणि त्याची पूजाहि पिशाचाचें रूप आणि पूजा यांसारखी झाली आहेत."
 राजा हा फार पराक्रमी व सर्वसत्ताधीश असल्यामुळे लोक त्याला मोठा मान देत आले आहेत. स्वार्थसाधु लोकांनी तर त्याला देवाचा अंश किंवा साक्षात् देवच ठरविलें. जिवंत राजाविषयी अशी कल्पना असल्यामुळे तो मेल्यावर महादेव ठरतो; आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याची विशेष प्रकारे पूजा करावी लागते. देवाची कल्पना प्रथम पिशाच कल्पनेपासून निघाली असावी, असें स्पेन्सरने अनेक प्रमाणांनी सिद्ध करून दाखविलें आहे. आगरकरांच्या मतें हिंदूंचा महेश किंवा शंकर हा देव अशा प्रकारचें उत्तम उदाहरण आहे. सृष्टीचा संहार करणें हें त्याचें काम. त्याच्या भक्तांनी शंकराचें जें वर्णन केलें आहे, तें त्या संहारकार्याला साजेसें उग्र आहे. चितेंतली राख अंगाला लावणें, मेलेल्या पशूचें ओलें कातडें अंगावर घेणें, गळ्यात नररुंडमाला धारण करणें, वेताळाबरोबर नाचणें असें त्याचें रूप भक्तिभावाने वर्णिलें जातें. त्यावरून महादेव हा एक महापिशाच आहे संशय नाही.
 मृतात्मे, पिशाच व देव हीं नांवें मात्र भिन्न आहेत; बाकी त्यांची मूळ प्रकृति एकच आहे, हा सिद्धान्त सांगितल्यावर आगरकरांनी, देवळें हीं थडग्यांपासून झालीं आहेत, असेंहि सांगितलें आहे. पूर्वी प्रेतें पुरण्याची चाल होती, तशी अजूनहि आहे. कांही जातींचे लोक व जंगम, गोसावी, वगैरे पंथांचे अनुयायी प्रेतें पुरतात, व त्या जागीं थडगीं बांधतात. प्रेतांचें दहन करणारे लोकहि मृत मनुष्याची समाधि बांधतात. थडगे किंवा समाधि हें पिशाचाचे निवासस्थान असतें. पिशाचाचा देव झाला की त्याची समाधि म्हणजे देवालय ठरते.
 मूर्तिपूजेचा उगम पिशाच- कल्पनेतूनच झालेला आहे, असें आगरकरांचें मत आहे. ते म्हणतात, "मूळ वस्तूचे गुण तिच्या प्रतिमेंत उतरतात हाच ग्रह प्रधानतः मूर्तिपूजेच्या मुळाशी आहे. प्रथमावस्थेतील लोकांना प्रकृति व तिची प्रतिकृति यांतील भेद न समजल्यामुळे, लहान मुलांप्रमाणे, एकीचे गुण दुसरीत उतरतात असा त्यांचा समज होतो; आणि म्हणून त्यांना असें वाटतें की, जर मृत मनुष्याच्या थडग्यावर त्याची प्रतिमा ठेविली तर तींत त्याचें पिशाच शिरेल." अशा प्रतिमांची आराधना व पूजा करून त्यांना तेल, पीठ वगैरे पदार्थ चोपडण्याची चाल सर्वत्र आढळते. अडाणी लोक दगडाला, थडग्याला तेल व शेंदूर लावून त्याची पूजा करतात, त्याला अन्नाचा वा मद्यमांसाचा नैवेद्य दाखवतात; यांतूनच म्हसोबा, पिरोबा, खंडोबा, इत्यादि देव जन्माला आले आहेत. सारांश, अज्ञान व अप्रबुद्धता यांतून मूर्तिपूजा उदय पावली आहे.