१५२ । केसरीची त्रिमूर्ति
करून संकटें निवारण्याचा प्रयत्न करूं लागतो; ' यांतच धर्मकल्पनेचा उगम आहे. बाह्य सृष्टीतील निर्जीव वस्तु आणि प्राणी यांनाहि आपल्यासारखींच मनें आहेत, आपल्यासारखेच राग-द्वेषादि विकार आहेत, असें मानून त्यांना संतुष्ट राखण्यासाठी त्यांचें स्तवन करणें, त्यांना कांही तरी वस्तु अर्पण करणें यांतून देवकल्पना व देवपूजा उदय पावली. सारांश, मनुष्याच्या अज्ञानामुळे, भिन्न भिन्न घटनांची कारणें त्याला कळत नसल्यामुळे अशा विचित्र कल्पना त्याच्या मनांत येतात आणि त्याच त्याला खऱ्या वाटू लागतात. सूर्य, चंद्र, दगड, माती, इत्यादि निर्जीव वस्तु; वड, पिंपळ, तुळस इत्यादि वनस्पति; मस्त्य, कूर्म, वराह, उंदीर, गाय, नाग, इत्यादि प्राणी यांना देव मानून त्यांची विविध प्रकारे पूजा करण्याची चाल भारतांतच नव्हे, तर जगांत सर्वत्र रूढ आहे.
पिशाच कल्पना
सृष्टीतील सचेतन व अचेतन वस्तूंच्या ठायीं मनुष्याचें बरें-वाईट करण्याची शक्ति असते, असें समजून त्यांना देवता मानणें हा देवतोत्पत्तीचा एक प्रकार; व प्रबल पुरुषासच जिवंतपणीं व मरणोत्तर देव मानून त्याची पूजा करणें हा दुसरा प्रकार होय. रानटी माणसाला झोप व मरण यांतील भेद कळत नाही. झोपलेला मनुष्य जिवंत असतो, त्याचप्रमाणे मेलेला मनुष्यहि दुसऱ्या कोणत्या तरी अवस्थेत जिवंत असला पाहिजे व आपल्या भोवतीं वावरत असला पाहिजे, असें त्याला वाटतें. मेलेल्या मनुष्याचें शरीर नाहीसें झालें तरी, त्याचा जीव किंवा आत्मा पिशाचरूपाने त्या व्यक्तीच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्याला सुख किंवा त्रास देत राहतो, ही श्रद्धा जगांतील बहुतेक रानटी लोकांत आढळून येते. त्यामुळे त्या पिशाचाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्याचा रोष होऊं नये म्हणून, त्याला प्रिय असलेली वस्तु अर्पण करणें, प्रार्थना करणें किंवा दुष्ट पिशाचाला मांत्रिकाच्या मदतीने गाडण्याचा प्रयत्न करणें, हे प्रघात सुरू झाले. पुढे कांही कारणांमुळे हींच पिशाचें वृक्षांच्या किंवा जनावरांच्या रूपाने प्रगट होऊन आपल्याला आनंद किंवा पीडा देतात, असें वाटून त्यांची आराधना सुरू झाली. याच पद्धतीने नद्या, पर्वत, चंद्र, सूर्य इत्यादि मोठ्या वस्तूंत आपल्या मृत आप्तांनी मरणोत्तर प्रवेश केला असेल, असा विश्वास उत्पन्न होऊन त्यांची पूजा करण्याचा प्रघात पडला असावा. रानटी लोक आपल्याहून श्रेष्ठ असा मनुष्य दिसला की त्याला देव मानतात व त्याला भिऊं लागतात. तो मेल्यानंतर त्याचें पिशाच तर अधिकच भीतिदायक ठरते. त्यामुळे त्याला कांही तरी देऊन संतुष्ट ठेवण्याची प्रथा सुरू होते. आगरकर म्हणतात, "मृत आप्तांच्या पिशाचांनी आपणावर कुपित न होतां आपली कृपादृष्टि सदैव चालू ठेवावी आणि पोरांबाळांस त्रास देऊं नये हें सारें श्राद्धविधीच्या व पितृतर्पणाच्या बऱ्याच भागांचें गुह्य आहे." अशा प्रकारे पिशाच-कल्पनेतून देवतांची कल्पना निघाली आहे, असें सांगून आगरकर म्हणतात, "ज्या उपायांनी व कृतींनी रानटी व अर्धवट सुधारलेलीं माणसें आनंद