१५० । केसरीची त्रिमूर्ति
आणि मग समाजाचें अस्तित्वच धोक्यांत येईल. म्हणून आगरकर म्हणतात, "तशा स्थितींत पराकाष्ठेचा क्रूर व जुलमी असा राजा असला तरी त्यापासून समाजाला नुकसानीहून अधिक फायदा होतो; आणि त्या एकट्याच्या जुलमापासून होणारी पीडा एकंदरीने अधिक हितावह होते. त्या अवस्थेत सारी दृष्टि समाजाच्या अस्तित्वावरच दिली पाहिजे. मनुष्यासारख्या बलहीन प्राण्यास क्रूर पशूंच्या व पशुतुल्य व्यक्तींच्या त्रासांतून सुटण्यास कसा तरी समाज करून राहणें व आपल्याचपैकी एखाद्या बलवंताचा आश्रय करणें, याहून स्वसंरक्षणाचा दुसरा मार्ग नसतो. (आमचें काय होणार?) पण समाज जसजसा समंजस, विवेकी होऊं लागतो तसतसें हें बलात्कार-तत्त्व नाहीसें होऊन समाजाचे व्यवहार संमति तत्त्वावर होऊं लागतात; आणि तसे झाले तरच त्याची प्रगति होते. व्यक्तिस्वातंत्र्य हा त्या संमति तत्त्वाचाच पूर्ण विकास होय.
अशा रीतीने मनुष्यसुधारणेचें मूल-तत्त्वच व्यक्तिस्वातंत्य आहे, हळूहळू बलात्कार नष्ट होऊन त्याच्या जागीं संमति-तत्त्व आल्यावांचून समाजाची प्रगति होणें शक्य नाही. हें आपल्या समाजाच्या नीट ध्यानांत आलें तर पाश्चात्त्य सुधारणेच्या तत्त्वांना असलेला त्याचा विरोध कमजोर होऊन हळूहळू तो नाहीसा होईल असें मनांत आल्यामुळे आगरकरांनी त्या मूल-तत्त्वांची ऐतिहासिक चिकित्सा केली आहे. ते म्हणतात, "तारवास जसें सुकाणूं किंवा इमारतीस जसा पाया तशी सामाजिक रचनेस व स्थित्यंतरास हीं तत्त्वें आहेत."
हिंदु समाज गाढ अज्ञानांत बुडालेला होता, त्याला कार्यकारणभाव कळत नव्हता, त्यामुळे त्याच्यावर लादली गेलेलीं असंख्य बंधनें त्याला प्रिय वाटत होती. ती बंधनें केव्हा कशामुळे आली, आचारधर्म कोणत्या हेतूने सुरू झाला, हे लोकांना माहीत नव्हतें. कोणतें कर्म केलें असतां पुण्य लाभतें व कोणत्या कर्मामुळे पाप लागतें एवढेच त्यांना माहीत होतें. त्या परंपरागत कर्मकांडावर त्यांची अंधश्रद्धा होती; पण धर्मसत्ता, राजसत्ता यांचें मूल स्वरूप समजलें की लोकांचे डोळे उघडतील; ते विविध आचार, तीं व्रतवैकल्ये व त्या अनंत रूढि यांचे समाजावरील पाश तुटून जातील व लोकांची बुद्धि स्वतंत्र होईल, या आशेने आगरकरांनी ही ऐतिहासिक चिकित्सा केली आहे.
आमचा धर्म सनातन आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला आहे, तो अपरिवर्तनीय असून परंपरागत आचार व रूढि पाळणें हेंच समाजाच्या हिताचें आहे. अशी लोकांची समजूत झालेली होती. आम्हीं उन्नतीचें शिखर गाठलेलें आहे; आणि अधिक उन्नतीला अवसर नाही, असेंहि त्यांना वाटत होते; पण पाश्चात्त्य विद्यारूपी दुर्बिणींतून जगाचें अवलोकन केल्यानंतर हा भ्रम नाहीसा होईल, अशी आगरकरांना खात्री वाटत होती; म्हणून त्यांनी समाजाला मनुष्यसुधारणेचीं मूल-तत्त्वें सांगून, मानवी प्रगतीची दिशा दाखविण्यासाठी हा प्रपंच केला आहे. जग सारखें