Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-३-

मनुष्यसुधारणेची मूलतत्त्वे



ऐतिहासिक चिकित्सा
 हिंदु समाजाला जी शिलावस्था आलेली होती ती नष्ट होऊन त्याच्या ठायीं पुन्हा प्राणसंचार व्हावा यासाठी 'व्यक्तिस्वातंत्र्य' हा निर्णायक उपाय होय, असें आगरकरांचें मत होतें. त्याचें प्रतिपादन त्यांनी कसें केलें तें आपण वर पाहिले; पण आगरकरांनी आपलें हें प्रतिपादन अधिक व्यापक भूमिकेवरून अनेक ठिकाणीं केलें आहे आणि त्याचाहि परामर्श घेणें अवश्य आहे.
 त्यांची व्यापक भूमिका ही की, 'व्यतिस्वातंत्र्य' हें आज आपल्याला जडलेल्या व्याधीवरच औषध आहे असें नाही, तर एकंदर मनुष्यसुधारणेचेंच तें मूलतत्त्व आहे. समाजाच्या प्रारंभीच्या काळी सर्वच क्षेत्रांत 'आज्ञाप्रामाण्य' किंवा 'दंडसत्ता' किंवा आगरकर ज्याला 'बलात्कार' म्हणतात त्याच तत्त्वावर समाजाचे सर्व क्षेत्रांतले व्यवहार चालू असतात. धर्म, राजकीय जीवन, समाजरचना या जीवनाच्या भिन्न अंगांचा विचार केला व त्या दृष्टीने मानवाचा इतिहास पाहिला तर धर्माचार्य, राजा व श्रेष्ठ वर्णीयांनी केलेल्या स्मृति किंवा कायदे यांच्या आज्ञेप्रमाणेच सर्वसामान्य जनतेला वागावें लागत असे, असें दिसतें. स्वतःच्या मताप्रमाणे वर्तन करण्याचा अधिकार कोणालाहि नव्हता. यालाच आगरकर बलात्कार-तत्त्व म्हणतात. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत हें कांही अंशी अपरिहार्यच असतें, असेंहि त्यांनी म्हटलें आहे. कारण स्वतः विचार करून उत्कर्षमार्ग कोणता तें अचूकपणें जाणण्याचें बौद्धिक सामर्थ्य त्या काळीं सामान्यजनांना आलेलें नसतें. अशा स्थितीत म्हणजे वन्यावस्थेत समाज असतांना लोकांना स्वातंत्र्य दिले तर समाजांत अराजक माजेल, मारामाऱ्या, लूट, विध्वंस, रक्तपात यांना ऊत येऊन सर्वत बेबंदशाही माजेल;