Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तिस्वातंत्र्य । १४७

निरनिराळ्या व्यक्तींत व समाजांत मतभेद उत्पन्न होतात, तसे होणें अनिवार्य आहे. प्रत्येकाने स्वतःला योग्य वाटतील तेच विचार लोकांना सांगितले पाहिजेत व त्याप्रमाणे आचरण केलें पाहिजे. "इष्ट असेल तें बोलणार व साध्य असेल तें करणार" हें आगरकरांच्या प्रतिपादनाचें सार त्यांनीच सांगितलें आहे. स्वतःच्या विचारसरणीबद्दल आगरकरांना केवढा जबर आत्मविश्वास वाटत होता तें त्यांच्या पुढील विधानावरून ध्यानांत येतें. "एखाद्या दुसऱ्या मनूची आणि पाराशराची कथा काय? आमच्या अर्वाचीन विचारास ज्या धार्मिक व सामाजिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत, त्यांस शेकडो मनूंचे व सहस्रावधि पाराशरांचे आधार दाखविलेत व त्यांचा प्रसार न व्हावा म्हणून कितीहि अडथळे आणून घातलेत तरी आमच्या मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक समजुतीस लागलेला 'वणवा' कोट्यवधि अजागळ कीटकांच्या क्षुद्र पक्षवाताने विझण्याचा मुळीच संभव नाही."
 पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे हिंदूंच्या धार्मिक व सामाजिक विचारांत क्रांति होईल व आचारांतहि बदल होईल, अशी खात्री आगरकरांना वाटत होती. कारण इंग्रजी सत्ता आल्यापासून हिंदूंच्या धार्मिक व सामाजिक मूढतेस धक्के बसूं लागले होते. नवीन प्रकारच्या शिक्षणामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करूं लागले होते, समाजाला जागृति आली होती. त्यामुळे व परिस्थितींच्या प्रभावामुळे हिंदूंच्या आचारांत बरीच शिथिलता आली होती. हिंदु धर्माला उतरती कळा लागली असा ग्रह होऊन त्याच वेळीं सनातन धर्माभिमानी लोक जुन्या आचारधर्मास कवटाळून बसलेले असल्यामुळे, त्याचें प्रस्थ चालू राहवें, त्याची सत्ता सर्व समाजावर पुन्हा प्रस्थापित व्हावी असा प्रयत्न ते करीत होते हें खरें; पण इंग्रजी शिक्षण चालू असेपर्यंत ती गोष्ट साध्य करणें अशक्य आहे, असें आगरकरांनी त्यांना बजावलें आहे. तेव्हा तसा व्यर्थ प्रयत्न न करतां नव्या कल्पनांचा स्वीकार करणें हेंच सर्वांच्या हिताचें आहे. अन्यथा तरुण पिढी वैदिक धर्माचा अजीबात त्याग करून निधर्मी बनेल असाहि इशारा त्यांनी दिला आहे.
विचारकलह
 पाश्चात्त्य शिक्षणामुळे, नव्या विचारांच्या प्रसारामुळे सुशिक्षित लोकांना आपल्या जुन्या आचारधर्मांतील दोष दिसूं लागले आणि ते सुधारावे अशी इच्छा त्यांच्या मनांत उत्पन्न झाली. त्यामुळे समाजांत दोन पक्ष निर्माण झाले; सुधारणावादी आणि सनातन धर्माभिमानी लोकांत वादविवाद सुरू झाले, कलह होऊं लागला. आगरकरांच्या मतें हें इष्टच आहे. ते म्हणतात, "बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतकें भितां कशासाठी? दुष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धि, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धि करणाऱ्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळे हें भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत