Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४६ । केसरीची त्रिमूर्ति

निर्भयपणे सांगितली पाहिजेत आणि समाजाच्या उन्नतीसाठी ज्या सुधारणा करणें आपल्याला योग्य वाटतें त्याहि सांगणें अवश्य आहे. लोकाग्रणी तसें न करतील तर समाजाची सुधारणा कधीच होणें वाक्य नाही. त्याचा नाश होणें अटळ आहे. निर्भयपणाचे महत्त्व विशद करतांना आगरकरांनी पुढे म्हटलें आहे, "पाश्चात्त्य ज्ञान पुष्कळ मिळवलें, नवीन विचार आत्मसात् केले तरी, त्याप्रमाणे वागण्याचें धैर्य नसेल तर त्यांचा समाजाला कांहीच उपयोग नाही. आपल्याकडील तत्त्ववेत्त्यांत एक मोठा दोष दिसून येतो तो हा की, त्यांना आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करण्याची उत्कट इच्छा किंवा धैर्य होत नाही. रूढ आचारधर्माचे आम्ही इतके गुलाम झालो आहों की, जुन्या गोष्टी आम्हांला सोडवत नाहीत. वाडवडिलांच्या विहिरींत खारे पाणी असले तरी तेंच आम्हांला प्रिय, तेंच आम्ही पिणार, असा आमचा दुराग्रह आहे. तो दुराग्रह सोडला पाहिजे. युरोप खंडांतील लोकांनी दुराग्रह सोडला म्हणून त्यांचा उत्कर्ष झाला. मध्ययुगांत युरोपांतील लोकहि धर्मपाशांनी अगदी जखडलेले होते, पण त्यांनी ते पाश तोडून टाकले म्हणून त्यांची उन्नति झाली. त्याप्रमाणेच आपणहि आपले कर्मकांडात्मक धर्माचे पाश तोडले पाहिजेत; आणि नवीन विचारांचे प्रतिपादन निर्भयपणें केलें पाहिजे. असें सतत केल्यानेच त्याप्रमाणे आचरण करण्याचें धैर्यं येतें." निर्भयपणा हा व्यक्तिस्वातंत्र्याचा एक पैलू आहे.
विवेक हाच आधार
 धर्मपाश तोडून टाकायचे म्हणजे बालविहासारख्या अनिष्ट प्रथा बंद करायला हव्या; पण त्यामुळे उभय कुळांतील चाळीस पिढ्यांना दुर्गति प्राप्त होण्याचें भय सामान्य लोकांना वाटत असतें, कारण तसें धर्मशास्त्र आहे. शेकडो वर्षे समाज तो आचारधर्म पाळीत आहे. यामळे कांही लोक धर्मशास्त्रांतच नवीन विचारांना, सुधारणेच्या तत्त्वांना आधार शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कोणत्या तरी प्राचीन ऋषीचा आधार हवा असतो. त्यावर आगरकर म्हणतात की, अशा आधाराची मुळीच आवश्यकता नाही. विवेक हाच आमचा आधार. आमची बुद्धि, आमची तळमळ, आमचें सृष्टिविषयक ज्ञान त्या जुन्या ऋषींच्या बुद्धीहून किंवा ज्ञानाहून कमी तर नाहीच, उलट अधिक आहे. तेव्हा धर्माचा निर्णय करण्याचा त्यांना जेवढा अधिकार होता तेवढा आम्हांलाहि आहे. म्हणून जुन्या धर्मशास्त्रांतील जे नियम आमच्या दृष्टीने समाजाला हितकारक असतील तेवढेच आम्ही पाळू व जे आम्हांला अपायकारक वाटतात ते टाकून देऊन त्यांच्या जागीं आम्ही नवीन नियम, समाजाला हितकारक असे नियम तयार करूं.
इष्ट असेल तें-
 समाजव्यवस्थेचे नियम करतांना जुन्या शास्त्रांचा आधार न घेतां स्वतःच्या बुद्धीचा आधार घेणार असा निर्धार व्यक्त केल्यानंतर आगरकरांनी त्याबद्दल स्वतःची भूमिका कोणती आहे, तें स्पष्ट केलें आहे. मनुष्याला बुद्धि असल्यामुळेच