Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४० । केसरीची त्रिमूर्ति

त्यांनी सुधारणेला विरोध करणें अगदी साहजिक आहे; पण ज्यांना तें मिळालें आहे, आणि सुधारणेचें महत्त्वहि पटलेलें आहे, त्यांनीहि सुधारणेला विरोध करावा हें समाजाच्या उन्नतीला फार घातक आहे, असें त्यांना वाटत होतें. 'स्वयंवर' या लेखांत बालविवाहाविषयी विचार करतांना ते लिहितात, "जुन्या पंडितांस वाटतें की, जगांत म्हणून जेवढें कांही ज्ञान आहे तेवढें संस्कृत भाषेतील ग्रंथसमूहांत भरलेलें आहे. त्याच्या बाहेर चहूंकडे अंधार आहे. त्यांना असें वाटणें कांही अंशी स्वाभाविकहि आहे; पण ज्या आमचे डोळे उघडले आहेत, त्या आम्हीहि संकुचित दर्शनाच्या शास्त्रीवैदिकांप्रमाणे किंवा अगदी मूढ जनांप्रमाणे वागत सुटावें ही मोठ्या लाजेची गोष्ट आहे."
 कांही सुशिक्षित लोक सुधारकांची व त्यांच्या नवविचारांची टिंगल करण्यांत भूषण मानीत होते. पंडिता रमाबाई या विदुषीचें व्याख्यान पुण्यांत झालें, तेव्हा कांही टवाळांनी तिथे जी हुल्लड केली तिचा तर आगरकरांना फारच संताप आला. पुण्याचे लोक आफ्रिकन लोकांपेक्षाहि रानटी झाले आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. कांही वर्तमानपत्रांनी त्या टवाळांना उत्तेजन द्यावें, याचेंहि त्यांना फार दुःख झालें.
 आपल्या देशांत स्वतंत्रपणे विचार करणारे लोक निघाल्यावांचून देशाची प्रगति होणार नाही, असें आगरकरांचें ठाम मत होते; पण आपल्या समाजांतील सुशिक्षित लोकहि नवीन विचार मनांत आणण्यास तयार नाहीत, असें त्यांना दिसून आलें. आगरकर म्हणतात, जुनें तेवढें निर्दोष व चांगलें असा आग्रह धरून बसून जर कोणी नवीन गोष्टींचें चिंतन व चर्चा करणार नाही, तर रूढ विचारांतले व आचारांतले प्रमाद दूर होणार कसे व नवीन विचारांचे व आचारांचे चांगुलपण प्रस्थापित होऊन ते रूढ होणार कसे? समाजाचा उत्कर्ष व्हावयास हवा असेल तर वाटेल त्या गोष्टींचा विचार करण्याची तयारी हवी, असें त्यांनी वारंवार सांगितलें आहे. देवाचें अस्तित्व, वेदांचें अपौरुषयत्व, मुंज, लग्न, इत्यादि संस्कारांची आवश्यकता, स्त्री-पुरुषांचा स्वैर समागम, संपत्तीवरील हक्क इत्यादि प्रश्नांचा निर्भयपणें व सखोल विचार करणें अत्यंत अत्यावश्यक आहे; पण सुशिक्षित लोकांनाहि तसा विचार मनांत येणें म्हणजे पाप वाटत असे, त्यामुळे आगरकरांनी त्यांच्यावर कडक टीका केली आहे.
 कांही सुशिक्षित लोक सुधारणेला विरोध करतांना, इंग्रजांपेक्षा पूर्वी आम्ही अत्यंत प्रगत होतों, असें सांगून आपल्या गतवैभावाचें गाणें गाऊं लागत. इंग्रज लोक अगदी रानटी अवस्थेत होते, तेव्हा आम्हांला शेती, विणकाम, लेखन या कला ज्ञात होत्या, मोठी घरें बांधतां येत होतीं व आम्ही सुधारणेच्या शिखरावर होतों, अशी बढाई ते मारीत. अशा आम्हांला पाश्चात्त्यांच्याकडून कांहीहि शिकण्याची आवश्यकता नाही, सुधारणा करण्याचें कारण नाही, हा त्यांचा आशय; पण आगरकर म्हणतात की, 'अशा फुशारकीने त्या पक्षाचें मंडन न होतां उलट मुंडनच होते; कारण पूर्वीच