आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला? । १३९
देशाभिमान पूर्वीपासूनच नव्हता. तो असता तर मुसलमानांचें राज्य येथे स्थापन झालेच नसतें. आमच्या नादानपणामुळे देशाला कायमचें पारतंत्र्य आलें. मूर्खपणाचे धार्मिक आचार, दुष्ट रूढि, विषम समाजरचना, राज्यकौशल्याचा अभाव यांमुळे स्वातंत्र्यरक्षणाचें सामर्थ्यच आमच्यांत राहिले नाही. आगरकर म्हणतात, "पेशवाईचा जो मोड झाला तो आमची सामाजिक व धार्मिक स्थिति जशी पाहिजे तशी चांगली नव्हती म्हणून झाला; आणि येथून पुढेहि आम्हांस सुदशा प्राप्त होण्यास व ती कायम राहण्यास आम्ही आपली गृहस्थिति व धर्माचार सुधारण्याचा प्रयत्न प्रथम केला पाहिजे. चांगली राजकीय स्थिति ही चांगल्या गृहस्थितीचें व धर्मपद्धतीचें फळ आहे."
पण हिंदु समाजाची तत्कालीन स्थिति पाहतां, आगरकरांना वाटू लागलें की, आम्ही पारतंत्र्यालाच लायक आहोंत. गुलामांचें राष्ट्र या लेखांत ते म्हणतात; "राष्ट्राचें ऐक्य होण्यास लागणारा एक तरी गुण आम्हांत भरपूर आहे काय? धैर्य नाही, उत्साह नाही, बल नाही; ज्ञान नाही, तर्क नाही, उद्योग नाही, कला नाही; खरा देशाभिमान नाही, खरी धर्मश्रद्धा नाही; खरें बोलण्याची किंवा खरें आचरण करण्याची सवय नाही; सारांश, चांगलें असें कांही नाही." हिंदु लोक मनुष्य नसून कीटक झाले आहेत; तेव्हा फ्रेंच, इंग्रज, जर्मन किंवा अमेरिकन लोकांनी येथे येऊन या देशावर राज्य करावें हेंच बरें, असें त्यांनी उद्वेगाने म्हटलें आहे. मराठींत चांगले ग्रंथ कां होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आगरकरांनी दिलें आहे की, समाजाची सर्वच क्षेत्रांत अवनति झालेली असतांना, दुसरें कांहीच चांगलें नसतांना, ग्रंथ तरी चांगले कसे होणार! या विधानावरून त्यांचा या बाबतींतला उद्वेग स्पष्ट दिसून येतो.
नवशिक्षितहि सुधारणा-विरोधी
अशा प्रकारे हिंदु समाजाला शिलावस्था प्राप्त झालेली असतांना गेल्या शतकाच्या प्रारंभी येथे इंग्रजांची सत्ता सुरू झाली आणि त्यांनी पाश्चात्त्य विद्येचा प्रसार केल्यामुळे समाजांत थोडेंसें चैतन्य खेळू लागलें. देशाचा ऱ्हास कोणत्या कारणांमुळे होतो, राष्ट्रोन्नतीचीं तत्त्वें कोणतीं; गृहस्थिति, समाजरचना यांत कोणती सुधारणा केली पाहिजे, खरा धर्म कोणता, राजकीय स्थिति कशी असायला हवी, हें सर्व बऱ्याच जणांना पाश्चात्त्य ग्रंथांच्या द्वारे कळू लागलें; आणि त्यांतून एक नवा सुधारणावादी वर्ग निर्माण झाला. लोकहितवादी, रानडे, तेलंग हे त्या वर्गाचे नेते होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे हळूहळू समाजाच्या सर्व क्षेत्रांत परिवर्तनहि सुरू झालें; आणि लवकरच समाजांत क्रांति होऊन सर्वांगीण सुधारणा होईल, देशाची उन्नति होईल अशी आशा उत्पन्न झाली; पण त्याच सुमारास सुशिक्षित, नवविद्यासंपन्न लोकांतच एक प्रतिगामी, पुराणमतवादी पक्ष निर्माण झाला. त्या पक्षावर आगरकरांनी फार कडक टीका केली आहे; कारण ज्यांना नवीन ज्ञान प्राप्त झालेलें नाही