Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२४ । केसरीची त्रिमूर्ति

ते वऱ्हाडांत अकोल्यास आपले मामा सदाशिवराव भागवत यांच्याकडे गेले, तेथे मामांनी त्यांना आश्रय दिला. त्या अकोल्याच्या शाळेतूनच १८७५ साली मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. विष्णु मोरेश्वर महाजनी यांच्या हाताखाली शिकण्याचें भाग्य त्यांना तेथे लाभलें होतें.
 पुढे कॉलेजचें शिक्षण घेण्यासाठी त्यांना असेच कष्ट करावे लागले. 'वऱ्हाड समाचार' या पत्रांत ते कधी लेख लिहीत, वक्तृत्व स्पर्धात भाग घेऊन बक्षिसाचे पैसे मिळवीत, कधी मित्रांकडून, गुरुजनांकडून मदत घेत. तरीहि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधला खर्च भागत नसे. एकाच सदऱ्यावर त्यांना वर्ष काढावें लागे. असे हाल झाल्यामुळेच त्यांची मूळची सुदृढ प्रकृति याच काळांत खालावू लागली.
 कॉलेजांतील पहिल्या वर्षीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गोपाळरावांना शिष्यवृत्ति मिळू लागली. त्यामुळे थोडी स्वस्थता मिळून इतिहास, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादि आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास त्यांना करता आला. १८७८ च्या नोव्हेंबर महिन्यांत ते बी. ए. ची परीक्षा पहिल्या वर्गांत उत्तीर्ण झाले. त्या वेळचे प्रिन्सिपॉल सेल्बी यांची या आपल्या शिष्यावर मर्जी होती. त्यांनी गोपाळरावांना फैलो नेमले. दक्षिणा फेलोशिप म्हणून त्यांना त्या वेळी ७५ रु. महिना मिळत. यामुळे दोन वर्षे निवान्त अभ्यासाला मिळून १८८० च्या नोव्हेंबरांत ते एम्. ए. झाले. एवढी उच्च पदवी मिळविल्यानंतर त्या वेळी त्यांना मोठ्या पगाराची सरकारी नोकरी सहज मिळाली असती; पण त्यांनी तो विचारहि केला नाही. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच आईला कळविलें होतें की, "तूं माझ्याविषयी मोठे मनोरथ करीत असशील; पण विशेष संपत्तीची हाव न धरतां मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार आहे."
 १८७९ सालीं आगरकर एम्. ए. चा अभ्यास करीत होते. त्या वेळी टिळकहि एल्एल्. बी. च्या अभ्यासासाठी डेक्कन कॉलेजांत राहिले होते. तेथे त्या दोघांची मैत्री झाली. विष्णुशास्त्री यांच्या निबंधमालेचें वाचन पूर्वीपासून दोघेहि करीत असत. १८७६ साली कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतांनाच आगरकरांनी राजकीय विषयावर एक लेख लिहिला होता आणि तो घेऊन ते विष्णुशास्त्री यांच्याकडे गेले होते. डेक्कन कॉलेजांत आगरकर व टिळक दोघेहि देशस्थितीविषयी नित्य चर्चा करीत. त्याच सुमारास विष्णुशास्त्री नवी शाळा काढण्याच्या विचारांत आहेत हें त्यांना समजलें. तेव्हा दोघांनीहि त्यांना जाऊन मिळावयाचें ठरविलें. टिळक लगेच जाऊन मिळाले. १ जानेवारी १८८० या दिवशीं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली; आणि वर्षअखेर एम्. ए. झाल्यावर आगरकर शाळेत आले.
 लोकशिक्षणाचे कार्य सर्व मार्गांनी करावयाचें असें त्या तिघांचें व त्यांच्या सहकाऱ्यांचें ठरलें असल्यामुळे त्यांनी पुढल्याच वर्षी १८८१ च्या जानेवारीमध्ये केसरी व मराठा (इंग्रजी) ही पत्रे सुरू केलीं व राष्ट्रीय जीवनाच्या विशाल क्षेत्रांत