चरित्र - रूपरेषा |
दधीचि
देवांवर मोठें संकट आलें होतें. वृत्रासुर उन्मत्त झाला होता. देवांचा त्याने छळ मांडला होता. देव हतबल झाले होते. अशा वेळीं दधीचि ऋषि त्यांच्या साह्यास धावून आले. आपल्या हाडांचें वज्र बनविलें तर त्याने इंद्राला वृत्ताचा वध करतां येईल असे त्यांना कळले. त्यांनी तत्काळ प्राणत्याग केला व देवांना आपल्या अस्थि उपलब्ध करून दिल्या. विश्वकर्म्याने त्यांपासून वज्र तयार केलें. तें वृत्रावर फेकून इंद्राने त्याचा वध केला व देवांना संकटमुक्त केलें.
भारतीयांवर संकट आलें होतें. अंध, विवेकहीन, जीर्ण, पुराण, रूढिधर्म उन्मत्त झाला होता. हिंदूंचा त्याने छळ मांडला होता. हिंदु अगदी हतबल झाले होते. अशा वेळीं एक अर्वाचीन दधीचि ऋषि त्यांच्या साह्यास धावून आले. त्या पुराण, दुष्ट, रूढ धर्माच्या शस्त्रांचे आघात आपल्या हाडांवर झेलले तर तीं बोथट बनतील, निकामी होतील व मग आपल्या अस्थींचें वज्र त्यावर फेकलें तर तो दुष्ट धर्म नामशेष होईल, हें त्यांच्या ध्यानांत आलें. त्यांनी तत्काळ आपल्या हाडांवर तें शस्त्राघात झेलण्यास प्रारंभ केला व शेवटीं प्राणत्याग करून हिंदूंना आपल्या अस्थि उपलब्ध करून दिल्या. हिंदूंनी त्यांपासून वज्र तयार करून तें त्या अंध, दुष्ट, रूढ धर्मावर फेकलें. त्याला नामशेष केलें व समाज संकटमुक्त केला. त्या अर्वाचीन दधिचि ऋषींचें नांव गोपाळ गणेश आगरकर.
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १८५६ साली कऱ्हाडजवळच्या टेंभू या खेड्यांत झाला. घरची फार गरिबी असल्यामुळे त्यांना बारा-तेराव्या वर्षांपासूनच शिक्षणासाठी नोकरी करावी लागली. कधी कारकुनाची, कधी कंपौंडरची अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. कधी ते वार लावून शिकले, तर कधी शगिर्दी करून. पुढे