चरित्रकार विष्णुशास्त्री । ८९
गेलीं तीं सर्व देवादिकांची व संतांची, आणि त्यांनी केलेले अद्भुत चमत्कार हाच त्यांचा मुख्य विषय. डॉ. जॉनसन हा त्या कोटींतला मुळीच नव्हे. मग त्याच्या चरित्राचा उपयोग काय? विष्णुशास्त्री यांनी प्रारंभीच या शंकेचे निरसन केलें आहे. अशा चरित्रापासून संसारास व लोकव्यवहारास उपयोग होतो. त्यापासून जो सदुपदेश प्राप्त व्हावयाचा तो सार्वभौम राजांच्या लढाया वाचल्यापासून होणार नाही, तर सामान्य लोकांच्या चरित्राच्या वाचनानेच होणार. सामान्य लोकांस ज्या अडचणी व जे प्रसंग येतात ते त्यांच्या सारख्याच मनुष्यांनी कसे टाळले व त्यांतून ते कसे उदयास आले हें समजल्यानेच तो हेतु साध्य होतो. या दृष्टीने पाहतां शिकंदर, कोलंबस किंवा वॉशिंग्टन यांच्या चरित्रांपेक्षाहि जॉनसनसारख्यांचें चरित्रच जास्त उपयुक्त होय.
विष्णुशास्त्री यांना लोकाभिरुचीस वळण लावावयाचें होतें. असें वर म्हटलें आहे, त्याचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. मानवी, वास्तवनिष्ठ चरित्राची त्या काळीं लोकांना अभिरुचीच नव्हती. ती प्रथम निर्माण करून मग तिचें पोषण करावयाचें, असे दुहेरी कार्य त्यांच्या पुढे होतें. डॉ. जॉनसनचें चरित्र लिहून त्यांनी तें साधलें आहे.
वास्तवाशी ओळख
अलीकडे चरित्रे लिहिली जातात त्यांना 'काल आणि कर्तृत्व', ' व्यक्ति आणि वाङमय' अशीं नांवें दिली जातात. त्यांचा आशय स्पष्ट आहे. व्यक्तीच्या चरित्रांत पार्श्वभूमि म्हणून तिच्या काळची सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादि सर्व परिस्थिति बारकाईने वर्णिलेली असते. व्यक्ति ही त्या परिस्थितीशीं बद्ध असते, त्या परिस्थितीमुळे तिच्या जीवनाचें रूप पुष्कळ अंशी निश्चित होतें हा सिद्धान्त यांत गृहीत धरलेला असतो; पण व्यक्तीच्या कर्तृत्वाला परिस्थितीमुळे वळण लागत असतें हा विचारच मागल्या काळीं चरित्रकारांच्या मनांत कधी आलेला दिसत नाही. महिपतीने किंवा बरखरकारांनी लिहिलेलीं चरित्रें पाहिली की हें सहज ध्यानांत येईल. त्यांचे चरित्रनायक सर्व अवतारी पुरुष होते. परिस्थितीमुळे त्यांच्या कर्तृत्वावर परिणाम होणें हें त्यांना शक्यच वाटत नसे. त्यांनी अवतार घेतला, लोकांचें तारण केलें आणि ते निजधामाला निघून गेले. ज्ञानेश्वर किंवा समर्थ यांच्या चरित्रांत त्यांच्या ग्रंथांची सुद्धा नीट माहिती दिलेली नाही. त्या चरित्रांत आज वर्णितात तशी व्यक्तीहि नाही आणि वाङमयहि नाही. सारा भर भिंत चालविली, गाय जिवंत केली, देवळाचें तोंड फिरविलें, लक्ष चौऱ्यायशीचा चुकविला फेरा यांवर आहे. हिंदी जनांच्या मनाचें पोषण गेली अनेक शतकें या अद्भुतावर, अवास्तवारच होत होतें. म्हणूनच ते राज्यकारभार, व्यापार, युद्ध, समाज-संघटना या प्रत्येक क्षेत्रांत अपयशी होत होते. पाश्चात्त्य विद्येमुळे मुख्य क्रांति कोणती झाली असेल तर ती ही की, वास्तवाशी आपली ओळख झाली. पण प्रारंभी ती सर्व इंग्रजी वाङमयाच्या व भाषांतरित वाङ्मयाच्या साह्याने होत होती. मराठींत तसें साहित्य निर्माण करून