-१२-
चरित्रकार विष्णुशास्त्री |
नवी ग्रंथ-पद्धति
साहित्य-समीक्षा लिहिण्यांत विष्णुशास्त्री यांचें जें उद्दिष्ट होतें तेंच चरित्र लिहिण्यांतहि होतें. त्यांना या देशांत मानसिक परिवर्तन घडवावयाचें होतें; लोकाभिरुचीस वळण लावावयाचें होतें; स्थल-कालाची चिकित्सा करणारी ऐतिहासिक दृष्टि लोकांना द्यावयाची होती; येथे प्रबोधनयुग निर्माण करावयाचें होतें; पाश्चात्त्य विद्येचा जो परिपाक इंग्लंड, फ्रान्स इत्यादि देशांत झाला तो त्यांना येथे घडवून आणावयाचा होता; देशाभिमान ही वृत्तीच येथे नव्हती ती त्यांना जागृत करावयाची होती; आणि यासाठीच चरित्र लेखन ही नवी ग्रंथ-पद्धति त्यांनी सुरू केली. डॉ. जॉनसन या चरित्र ग्रंथांच्या प्रारंभी तो ग्रंथ लिहिण्याची कारणें सांगतांना, ही एक नवी ग्रंथ-पद्धति आहे, हें एक कारण त्यांनी सांगितलें आहे. राष्ट्रीय संसारांत ज्याप्रमाणे त्यांना अनेक नव्या पद्धति निर्माण करावयाच्या होत्या त्याचप्रमाणे साहित्य-संसारांतहि निर्माण करावयाच्या होत्या. टीका ही नवी पद्धति, चरित्र ही नवी पद्धति, निबंध ही नवी पद्धति. अलीकडे यांना वाङमय प्रकार म्हणतात. विष्णुशास्त्री यांनी त्यांना ग्रंथ-पद्धति म्हटलें आहें. त्यांतील चरित्र हो जी नवी ग्रंथ-पद्धति त्यांनी सुरू केली तिचा परामर्श आता करावयाचा आहे.
उपयोग काय?
विष्णुशास्त्री यांनी जे टीका लेख लिहिले त्याच्या आरंभी त्यांनी एक प्रश्न उपस्थित करून त्याचें उत्तर दिले आहे. वाचक म्हणतील की, या टीकेचा उपयोग काय? हाच प्रश्न जॉनसनच्या चरित्राविषयी लोक विचारणार. कारण अशा तऱ्हेची चरित्रे पूर्वी भारतांत केव्हाहि लिहिली गेली नव्हती. जी चरित्रे लिहिली