पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भरायला पैसे लागत नाहीत, बघू साहेब कसा पैसे घेतो?' असं म्हणून स्वत: कार्यालयात गेल्या आणि अनेक अडाणी लोकांना जिथे अनाठायी पैसे द्यावे लागत ते त्याच्या मुळे थांबलं.

 आर्थिक व्यवहाराचीही यातून सवय झाली आहे. पैसे बँकेत भरणे, काढणे, पैशांचा हिशोब करणे, त्याची नोंद ठेवणे हेही अनेकजण -जणी नियमितपणे करतात. गुरुप्रसाद इंजिनियरिंगच्या लक्ष्मणराव कोंडे यांनी पद्धतशीर हिशोब मांडणी केली आहे. ती खरोखर समजून घेण्यासारखी आहे. ही पद्धत त्यांनी स्वत:च अनुभवातून विकसित केली आहे. यातील अनेकजण विशेष शिकलेले नाहीत किंवा शाळा सोडलेल्याला अनेक वर्ष झाली आहेत. गणिताशी संपर्क तुटला होता असेही आहेत. पण तरीही उद्योगाची गरज म्हणून पुन्हा बेरीज, वजाबाकीकडे वळले आहेत. त्यातून कशाकशावर किती खर्च केला, जमा किती झाले, वस्तूचा भाव कसा ठरवायचा अशा सर्व आकडेमोडी करतात. तर काहींना त्यांची शाळेत जाणारी मुलं मदत करतात.

 कौटुंबिक समस्यांना उद्योगातून उत्तर मिळालं -

 संसार उभे राहण्याची, सावरण्याची संधी अनेक उद्योगांनी कुटुंबांना मिळवून दिली हे याचं एक वेगळं परिमाण, काही उदाहरणांमध्ये बायकोकडे नवरा परत आला. मुलांना परत वडील मिळाले आणि संसाराचं सुख पुन्हा एकदा परत आलं. काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. काहींच्या म्हातारपणाला पेन्शनबरोबर आणखी जोड मिळाली. काहींना कर्ज फिटण्यासाठी मदत झाली. काही तंत्रज्ञांनी नवीन लोकांना शिकवून, काम देवून त्यांच्या रोजगाराची सोय केली.

 विशेषत: बायकांसाठी कौटुंबिक पातळीवरं बराच फरक पडला. 'कमवती स्त्री' झाल्यामुळे घरात तिच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलला. तिच्या मताला किंमत आली. थोडंसं निर्णयस्वातंत्र्य, घरच्या निर्णयामध्ये तिला जागा मिळू लागली. तिला घराबाहेर जाण्याचं, इतर चार गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य मिळू लागलं. 'बाया-बाया जमल्या तर कुठे बिघडलं? त्यात काय वाईट आहे?' असं घरच्या पुरुषांनाही वाटायला लागलं. बचत गटाच्या माध्यमातून पुरुषांना, शेतीसाठी, घरच्या अडी-नडीला कर्ज सहजासहजी उपलब्ध झालं. घरातल्या आर्थिक उलाढालीत बाईला आपलं स्थान निर्माण झाल्यावर घरातही तिचं स्थान तयार होऊ लागलं. तिच्या कष्टाला मोल आलं. उद्योजकतेचा हा कौटुंबिक पैलू आर्थिकतेपेक्षाही अधिक महत्त्वाचा आणि मनोहर आहे.

 यातूनच स्त्रीचा, उद्योग करणाऱ्या तरुणांचा आत्मविश्वास वाढीला लागतो. जगण्याची नवी उमेद मिळते. पुढे पाऊल टाकण्याची हिंमत मिळते. माणूस म्हणून घडणीतला हा एक मोलाचा टप्पा म्हणावा लागेल.

कोणतेच काम हीन दर्जाचे नसते.    ३९