पान:केकावलि.djvu/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रथम थोडे दिवस वाईट वाटले तरी परिणामी त्यापासून त्याचे हितच होते. एकमेकांचे पक्के हाडवैरी अशा देवदैत्यांनी समुद्राचे जेव्हां मंथन केले, तेव्हां प्रथम विषोत्पत्ति झाली खरी, पण त्या मंथनामुळेच पुढें अत्युत्कृष्ट अशी त्रयोदश रत्ने निर्माण झाली. मृतांस सजीव करणारे प्रसिद्ध अमृतही त्यांतीलच एक रत्न होय. तद्वत् टीकाकाराच्या प्रखर व अमोघ अशा शरांच्या संधानामुळे काही वेळ मनःशोभ होऊन संताप आला, तरी शेवटी ग्रंथकर्त्यांची खरी सुधारणा होण्यास तेंच उत्तम साधन होतें. उलटपक्षी गुळमुळित किंवा गुळचट टीकेपासून सत्यनिर्णय किंवा ग्रंथकाराची सुधारणा होण्याच्या कामी उपयोग न होतां प्रतिबंध मात्र होतो. तेव्हां यांतील दोषस्थळे अवश्य दाखवावीत एवढेच वाचकांपाशी मागणे आहे. आतां हे पुस्तक लिहितांना मला ज्या काही सद्गृहस्थांनी साह्य केले त्या सर्वांचे आभार मानणे ह्या स्थळी उचित आहे. महाराष्ट्रकाव्यपंडित व सुप्रसिद्ध टीकाकार असे माझे गुरु रा. रा. हरिपंत पंडित, डेप्युटी म्यानेजर, कोर्ट ऑफ वॉर्ड्स, नागपुर, ह्यांनी केकावलीवर टीपा देतांना मला पुष्कळ उपयुक्त सूचना केल्या ह्याबद्दल मजवर त्यांचे फार उपकार आहेत. तसेंच शालापत्रककार रा. रा. रामचंद्र भिकाजी जोशी यांनीही बऱ्याच गोष्टी सुचविल्या ह्मणून त्यांचे मी आभार मानितों. कविचरित्र व केकावलीची प्रस्तावना हे दोन निबंध लिहितांना मला नामदार न्यायमूर्ति रावबहादुर माधवराव गोविंद रानडे व प्रो. राजारामशास्त्री भागवत यांनी बऱ्याच गोष्टी सुचविल्या याबद्दल मी त्या उभयतांचा अत्यंत ऋणी आहे. आतां समाप्तीचे समयीं, मयूरकवीच्या ह्या स्तोत्रावर टिप्पणी देऊन त्याचे मधुर कूजित अंशतः तरी इतरांच्या कर्णावर पाडण्याचे मला त्या जगज्जनकानें सामर्थ्य दिले यास्तव त्याला भक्तिपूर्वक नमन करून मी सध्या येथेच विराम पावतो. - ता. १ नोव्हेंबर, १८९७. सर्व रसिकांचा नम्र सेवक, श्रीधर विष्णु परांजपे. खेदप्रदर्शनः मराठी भाषेचे कैवारी व पंताचे मार्मिक भक्त न्यायमूर्ति रानडे, रा. सा. हरिपंत पंडित व श्री. बापूसाहेब कुरुंदवाडकर हे मला गुरुस्थानी असणारे तिघे विद्वन्मणि ही दुसरी आवृत्ति पाहण्यास आज जिवंत नाहीत ह्मणून मला फार खेद वाटतो. - ता. १ मार्च १९०२. श्री. वि. प.