पान:केकावलि.djvu/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) गीतींत विस्तार केला आहे. (परिशिष्ट-ऋ पहा). तसेंच कुशलवाख्यानांतही बरेंच विस्तृत वर्णन आहे. त्यांतील काही श्लोक तर कालिदासाच्या श्लोकांचे प्रतिबिंब आहेत. त्यावरून कालिदासाचे काव्य पंतांचे फार आवडतें असावे असे दिसते. सारांश, शृंगारादि नवरसांच्या तरंगिणींत पंतांनी प्रसंगविशेषीं झटपट स्नान मात्र केले असून कालिदासांनी त्या त्या प्रसंगी अंगास सुवासिक द्रव्ये लावून इतर मंडळीला बरोबर घेऊन यथेच्छ घटका घटका क्रीडा केलेली आढळते. याचे एक मुख्य कारण असे दिसते की कालिदासादि कवीच्या काव्यरचनेचा उद्देश मुख्यत्वे कीर्तिलाभ करून घेण्याचा असून ईश्वरप्राप्ति व्हावी हा मोरोपंतादि महाराष्ट्रकवींचा मुख्य उद्देश आहे (पृष्ट ८८ टीप पहा). यास्तव त्यांचा कल सृष्टिदेवतेची निरनिराळ्या प्रसंगी दिसून येणारी शोभा वर्णन करण्याकडे नसून भगवंताचें किंवा त्याच्या भक्तांचे गुणवर्णन करण्याकडेच सर्वस्वी आहे. 'प्रसाद' गुण कालिदासाच्या काव्यांत उत्कर्षानें वर्तत असून मोरोपंताच्या काव्यांत 'ओज' किंवा प्रौढता हा गुण मुख्यत्वे आढळतो. 'उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवं दंडिनः पदलालित्यं' अशी संस्कृत कवींत काव्यगुणांची वाटणी केली आहे. पंतांच्या काव्यांत वरील तिन्ही कवींचे गुण उत्कर्षानें वर्तत असल्यामुळे 'कालिदासाची, भारवीची व दंडीची-मिळून त्रिवेणी एकट्या पंतांच्या काव्यांत एकत्र संगम झालेली उघड आढळते.' (आ) तुकाराम व मोरोपंतः-तुकोवा हे मोठे भगवद्भक्त असल्यामुळे त्यांच्या काव्यांत कवित्वस्फूर्ति जास्त आहे. त्यांचे अभंग साधे सरळ, पण मोठे जोरदार असून, हृदयाला पाझर फोडणारे आहेत. अभंगांतून नीत्युपदेश सणसणित असून भगवद्भक्तीचा त्यांच्या काव्यांत मूर्तिमंत कळस उभारिला आहे. याशिवाय वाळक्रीडेवर किंवा रुक्मांगदादि चरित्रांवर त्यांचे अभंग थोडे असून बहुतेक अभंगांत त्यांच्या स्वतंत्र व प्रेमळ विचारांचाच भरणा आहे. मोरोपंत उत्तम पंडित होते. तुकोबाचे शिक्षण अगदीच सरासरीचे. पंतांनी भाषा कमाविण्यास फार प्रयत्न केला. तुकोबास ज्या वेळेस जशी स्फूर्ति झाली तशा प्रकारचे अभंग त्याच्या मुखांतून निघाले. पंतांच्या कवित्वाचा झरा त्यांच्या डोक्यांतून निघाला; तुकोबाच्या कवित्वसागराचा उगम त्याच्या हृदयांतून झाला. पंतांची कविता पुण्याच्या नखरेदार पण भाविक कुलवधूप्रमाणे असून तुकोबाची कविता एखाद्या साध्याभोळ्या पंढरपुरच्या वारकरिणीप्रमाणे दिसते. एकीच्या कपाळावर रेखीव व कोरून लाविलेला कुंकुमतिलक असून दुसरीने कपाळभर मळवट भरलेला आहे. सारांश तुकोबाची कविता 'कृताभ्यंगस्नाना कनकमणिभूषाविरहिता धवलवसना' अशी असून पंतांच्या कवितेचा थाटमाट व एकंदर वर्तणूक 'लज्जाव्यालोलदृष्टी, स्मितरुचिरमुखी, भ्रूयुगी नृत्य, नर्म । व्याहारी, कोमलांगी, अभिनव मिरवे धर्मरोमांचवर्म. ॥ अशी आहे. अर्थात्च भाषेची शुद्धि, व्यवस्थित वाक्यरचना, सुरस नवरसवर्णने हे प्रकार मोरोपंतांच्या काव्यांत जास्त दृष्टीस पडतात. ब्रह्मानदी टाळी लागल्यावर देह संभाळणेच ज्यांना जड वाटते ते संतमुकुटमणि अशा बाह्य गोष्टीकडे कसचे लक्ष्य देतात. एकंदरीत तुकारामाची योग्यता तुकारामालाच.