Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६८

पाळच्या राजाने एक नंदिकेश्वराचे देऊळ बांधिले आहे. ह्या मंडपाच्या ईशान्येस महजिदीपासून सुमारे १५० यार्डांवर आदि विश्वेश्वराचे मंदीर आहे. हे देऊळ फार जुनाट आहे. त्याचा घुमट अगदी मोडकळीस आलेला आहे. ह्या देवळाच्या खालच्या भागाचा जीर्णोद्धार एक गणेशदास तंबाकूवाला यानें केला आहे. आदि विश्वेश्वराच्या देवळाच्या पूर्वेस थोड्याच अंतरावर काशी कर्वत नामें कूप आहे. ह्या कूपास वरून चालीप्रमाणे तोंड असून एक आंत उतरण्यास वाट आहे, परंतु ती आतां दर सोमवारी मात्र काही वेळ खुली असते. ह्याचे कारण असे सांगतात की, कांही वर्षांपूर्वी एका बैराग्याने येथे शिवार्चन करून प्रसिद्धपणे जळसमाधि घेतली. तेव्हां पासून सरकारने ती वाट अगदी बुजवून टाकिली होती. पुढे तेथील पुजाऱ्याने अर्ज करून पुनः तशी गोष्ट न होऊं देण्याबद्दल मुचलका देऊन दर सोमवारी अमुक वेळ तो रस्ता यात्रेकऱ्याकरितां खुला ठेवावा असा हुकूम आणिला. ह्या भागांत पुष्कळ देवळे ज्यांची कारागिरी उत्कृष्ट अशी आहेत.
 विश्वेश्वराच्या देवळापासून थोडेसे पुढे गेले म्हणजे शनीचे देऊळ लागते. तेथून पन्नास पाऊणशे कदम पुढे गेले म्हणजे अन्नपूर्णेचें मंदीर लागते. ह्या देवीचे काम सर्वांस भोजन घालण्याचे आहे. येथे असा चमत्कार सांगतात की, कोणत्याही प्रकारचा तडीतापडी अतिथी उपोषित राहात नाहीं. सर्वांस ह्या अन्नपूर्णेच्या कृपेने भोजन मिळते. येथे भिजवून मूठ मूठ दाळ वाटण्याची चाल फार आहे. ह्याबद्दल कथा अशी सांगतात की, जेव्हां प्रथमतः श्री अन्नपूर्णा काशीवासास आली तेव्हां श्री० विश्वेश्वरानी तिला माझ्या नगरीत कोणी उपोषित राहू नये अशी तजवीज तू ठेव म्हणून सांगितले. तेव्हां इतक्या लोकांस अन्न पाणी माझ्या एकटीच्याने कसे पुरवेल अशी काळजी ती करीत बसली. तेव्हां गंगेनें येऊन तिला सांगितले कीं, तूं सर्वांस मूठ मूठ दाळ दे म्हणजे मी त्यांस लोटा लोटा पाणी देईन.