Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेतली होती त्यांस सेकंड क्लासांत घातले. परंतु महाराज काय विचारतां त्या लोकांस ज्यांत नेटिव सेकंड क्लास प्यासेंजर होते त्यांत मात्र भरले आणि आम्ही जरी सगळा दिवस लांबून प्रवास केला होता तरी आम्हास रात्रीही विश्रांतीस जागा नाहीशी झाली. आमची स्थिति चौथे क्लासच्या लोकांप्रमाणे झाली. आम्ही रेल्वेकडील लोकांस पुष्कळ सांगितले की, आम्हास दुसऱ्या सेकंड क्लासांत बसवा आणि मग आमच्या गाडीत तिसऱ्या क्लासचे प्यासेंजर भरा पण पडलो नेटिव तेव्हां आमचे ऐकतो कोण! आमच्या फजितीस पारावार नाहीसा झाला. रुपयांपरी रुपयेही गेले आणि शेवटी चौथ्या क्लासच्या प्यासेंजराची दशा प्राप्त झाली. नंतर आम्ही सकाळ हर्द्यास उतरलो तेव्हां सुमारे सहा वाजले होते. तेव्हां गाडीतून बाहेर पडण्याची मुष्किल पडली व स्टेशनमास्तर धक्के मारूं लागले. तेव्हां आम्ही त्यांस विचारले की, असे करण्याचे कारण काय? तेव्हां त्यांनी उत्तर दिले की, "This is the way in which native passangers should be treated." आम्ही बरे म्हणून मुकाट्याने गांवांत चालते झालो. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जबलपुरास आलो.
 बऱ्हाणपुराच्या पुढे आपल्या तिकडील रीती भाती सर्व पालटतात. इकडे हिंदुस्थानीची झांक दिसूं लागते. माळवा, नमाड आणि गोद्रवण हे प्रांत लागतात. तापी, तवा आणि नर्मदा ह्या मोठ्या नद्या वाटेने लागतात. बहाणपुरापासून सातपुडयाचा डोंगर लागतो. ह्या प्रांतांत आगगाडीचा रस्ता तयार करण्याच्या कामांत इंजनेरी कामाची खूपच अक्कल लढिवलेली आहे असे स्पष्ट दिसतें. सगळ्या सातपुड्यांत फक्त एके ठिकाणी मात्र बोगदा पाडावा लागला आहे. बाकी एकंदर रस्ता सपाट मैदानांतून नेला आहे. इकडे लोक पाहिले तो उर्दू भाषा बोलतात. इकडे यंदा दक्षिणेपेक्षां पाऊस बरा झाला आहे. धारण स्वस्त आहे. गव्हाच्या शेतांची पटांगणे कोसोगणित आढळतात.