ता० जानेवारी १८७२.
ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
वि० वि०. गेल्या पत्रीं आपणाकडे मानमंदीर मोहोल्याची हकीकत लिहून पाठविली. ती आपण कृपा करून छापालच. हल्लींच्या पत्र दशाश्वमेध मोहोल्याचे विवरण लिहून पाठवितो. तिला आपल्या सुंदर पत्राच्या एका अंकांत कृपा करून जागा द्या.
दशाश्वमेधाचा घाट मानमंदीर घाटाच्या दक्षिणेस आहे. ह्या घाटी स्नानादि कर्माचें महत्पुण्य आहे याकरितां यात्रेकरू व क्षेत्रस्थ येथे जितकी स्नानें साधतील तितकी साधून घेतात. ह्या क्षेत्री पंचतीर्थी म्हणून जी यात्रा करितात त्या यात्रेचे एक श्राद्ध येथे करावे लागते. बाकीची चार श्राद्धे अशी संगम मणिकर्णिका, पंचगंगा, आणि वरुणा संगम ह्या ठिकाणी केली पाहिजेत. ह्या पांच ठिकाणच्या श्राद्धाची फले जगंनाथ, गया, प्रयाग, वाराणशी, हरिद्वार इत्यादि स्थली श्राद्ध यात्रा करून जे फल प्राप्त होते तत्समान आहे.
दशाश्वमेधाची कथा मला एकानें सांगितली ती येथे लिहितो. कोणे एके दिवशीं शिव आणि पार्वती मंद्राचल पर्वताच्या शिखरावर क्रीडा करीत असतां एकाएकी शंकरास वाराणशी क्षेत्राचें स्मरण झाले आणि तेथील वर्तमान आपणास पुष्कळ दिवस कळले नाही म्हणून त्यास फार खेद झाला. श्री वाराणशी येथे दिवोदास राजा राज्य करीत होता. त्याने महादेवासुद्धां सर्व देवांस श्री वाराणशींतून हाकून लावले होते. नंतर शंकर तेथून निघून कांहीं दिवस मंद्राचलावर उमेसह येऊन राहिले होते. तेथून पुष्कळ दूतांस त्यांनी वाराणशीस जाऊन तेथील वर्तमान काय आहे हे पाहून येण्यास आज्ञा केली व ते दूत वाराणशीस गेले. परंतु वाराणशी क्षेत्राचा महिमाच विलक्षण ह्यामुळे जो दूत तेथे जाई तो