मुक्काम श्री क्षेत्र वाराणसी
ता० ३ जानेवारी सन १८७२
ज्ञानप्रकाशकर्ते महाराज, -
वि०वि०. गेल्या पत्री म्या आपणाकडे लखनौ शहरची वगैरे हकीकत लिहून पाठविली तिजला आपण आपल्या सुंदर पत्र जागा दिली ते पाहून मजला परमानंद झाला. आतां आपणाकडे फैजाबाद आणि अयोध्या ह्या हर्दू शहरांची थोडीशी माहिती लिहितो. तिला कृपा करून जागा द्याल अशी उमेद आहे.
महाराज, लखनौ शहरी अयोध्यस जाण्याकरितां घोड्याच्या गाड्या मिळतात. त्यांत रेकल्यासारखी एक गाडी असते तीत ६ प्यासेंजर बसतात. शिवाय एक कोचमन आणि दुसरा घोडेवाला असे आठ असामी असून त्यांचा सामानाचा बोजाही त्या गाडींत सांठवितात आणि दोन घोडे तिला जोडून ती चालवितात. ह्या गाडीचे भाडें फैजाबादपावेतों १५ रुपये पडतें. ही गाडी लखनौहून निघाल्यापासून सुमारे २० तासांनी अयोध्यस दाखल होते. अयोध्येच्या आलीकडे सुमारे २ कोसांवर फैजाबाद आहे. त्यास मुसलमान लोक बंगला ह्मणतात. लखनौ पासून अयोध्यस जाण्यास जो सडकेचा रस्ता बांधिला आहे, तो फारच चांगला आहे. वाटेनें दुतर्फा झाडांची दाट गर्दी आहे. फैजाबाद हें शहर फार मोठे आहे. येथील इमारती वगैरेची शिस्त कानपूर वगैरे शहराप्रमाणेच आहे. अयोध्या क्षेत्र शरयू नदीच्या काठी आहे. ही नदी फार मोठी आहे. अयोध्या शहर हे त्रेतायुगीं श्री रामाच्या राज्याची राजधानी होतें. ह्या क्षेत्री श्री रामाचीं मंदिरें सुमारे ३ हजार आहेत. येथे अयोध्येचा महिमा असा आहे कीं, अयोध्यावासी जितके लोक आहेत ते सर्व जगन्नायासम आहेत. ह्याकरितां एडिटरराव आसपास राजे रजवाडे लोक येथे जितका पुष्कळ होईल तितका वास करितात.