पान:काशीयात्रा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 येथे नयाजीराव शिंदे अलीजा बहादूर ग्वाल्हेर ह्यानी एक कृष्ण मंदीर बांधण्याचे काम चालविले आहे. त्यास हल्ली दहा लाख रुपये खर्च झाले आहेत. त्या शिवाय येथें पुष्कळ मंदिरें व इमारती भरतपूरचे राजाच्या, झिंदचे राजाच्या, नाभाचे राजाच्या वगैरे पुष्कळ आहेत.

 वृंदावनास कृष्णाच्या वेळचे कुंजवन आहे. तसेच निधिवन आहे. जेथे कृष्णानी गोपीचे वस्त्र हरण केले तो चीरघांट आहे. व त्यावर कदंब वृक्ष आहे. केशी दानवाचा वध केला तो केशी- घांट आहे. राधा गुप्त झाली तें ठिकाण आहे.अशी जुनी अनेक ठिकाणे आहेत.मथुरेस ज्या ठिकाणी कंसाचा वाडा होता तें ठिकाण आहे.श्री कृष्णानी कंस वध करून विसावा घेतला आहे त्या स्थलास विश्रांतघांट म्हणतात,तेथे पादुका आहेत व वर देवालय आहे.

 गोकूळ मथुरेपासून दक्षिणेस तीन कोस आहे तेही यमुना तटाकी आहे.गोकुळ हा गांव पुजाऱ्यास जहागीर आहे.येथे मांकडांचा सुकाळ आहे.गोकुळांत नंदाच्या वाड्याची जागा आहे.रमण रेती आहे.कृष्णानी बाळलीला केल्यापकी पुष्कळ जागा आहेत.गोकुळापासून अर्ध कोसावर महावन आहे. तेथेही कृष्ण लीलेची पुष्कळ स्थले आहेत.

 इकडे लोक साधारणतः गरीब आहेत. इंग्रजी अमलास फार भितात. परंतु अमलामध्ये बरीच अंदाधुंदी आढळते.मथुरेच्या पेढ्याचा मोठा लौकिक आहे. येथे पितळेची भांडी तऱ्हे तन्हे- चीं मिळतात त्यांत पितळेच्या गाई फार सुबक होतात.

एडिटराचा मित्र फिरस्ता.