पान:कार्यसंस्कृती.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' मेड इन जपान कार्यसंस्कृती या विषयात ज्यांना रस आहे अशा सर्वांनी आकिओ मोरिटा यांचं 'मेड इन जपान' जरूर वाचायला पाहिजे, नव्हे त्याची पारायणं करायला पाहिजेत. जपानमधल्या सोनी कंपनीची ती कहाणी आहे. तिच्या भरभराटीची. तिच्या नीतितत्त्वांची मोठे मोठे उद्योग, संस्था किंवा संघटना उभ्या राहतात, मोठ्या होतात आणि नेत्रदीपक कामगिरी करतात, तेव्हा त्या सर्वांच्या मुळाशी काही तत्त्वं, नियम आणि सूत्रं असतात. या पुस्तकात त्या सूत्रांची फारच सुंदर चर्चा आहे. मोठे उद्योग, मोठ्या संघटना उभारतात ती माणसं आणि माणसं जशी पगारावर काम करतात तशीच ती संबंधावर, प्रेमावर आणि ध्येयापोटी, वेडापोटीही करतात. जपान या बाबतीत तर अमेरिकेपेक्षा निश्चितच वेगळा आहे. कारखान्याकडे किंवा उद्योगसंस्थेकडे ही जपानी माणसं एखादं कुटुंब असल्यासारखं पाहतात. एखादा माणूस नीट काम करत नसेल तर त्याला लगेच काढून टाकत नाहीत. त्याला इथे तिथे त्या मोठ्या कुटुंबातच कुठं तरी सामावून घेतात, एकदम दूर लोटत नाहीत याची फार सुरेख चर्चा या पुस्तकात आहे. माणसं जोडणं, ती टिकवणं, त्यांच्यातली ताकद वाढवणं, त्यांच्या बरोबरीच्या संबंधांना दूरगामी नजरेनं पाहणं ही आकिओ मोरिटा यांची संस्कृती माणसाला, मानवी संबंधांना महत्त्व देणारी कार्यसंस्कृती. कार्यसंस्कृती