पान:कार्यसंस्कृती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वत्र आणि अटळ


 जेव्हा एका माणसाचा संबंध दुसऱ्या माणसाबरोबर येतो तिथं कार्यसंस्कृतीचा जन्म होतो,मग त्यात एकत्र राहणं आलं, प्रवास करणं आलं, एकत्र काम करणं आलं, नव्हे लढणंही आलं.
 माणूस प्रगट होतो तो त्याच्या कार्यसंस्कृतीमधून तो वागतो कसा, एकत्र राहतो कसा, दुसऱ्यांना मानतो कसा आणि काम करतो कसा यातून कार्यसंस्कृती दिसते. अगदी जंगलात होतो तेव्हापासून आपण आपली कार्यसंस्कृती घडवत आणली. काम करत करत, ते करण्याचं शिकत शिकत आपण आपली संस्कृती घडवली. शेतात काम, कारखान्यात किंवा कार्यालयात काम, गेली हजारो वर्ष आपण काम करता करता शिकत गेलो. त्यातून आपण आपली कार्यसंस्कृती बनवली.
 या कार्यसंस्कृतीचा आवाका खूप मोठा आहे, व्यापक आहे. मी, माझं मन किंवा 'मी' फक्त 'माझ्याशी' सोडलं की जेव्हा आणि जसा मी समाजाला भिडतो तिथं कार्यसंस्कृतीचा उदय होतो. घरात, रस्त्यावर,वाहन चालविताना, लोकलमध्ये आणि कार्यालयात.
 कार्यसंस्कृती सर्वत्र आहे. कार्यसंस्कृती अटळ आहे, आणि ही कार्यसंस्कृती ठरवणार आहे आपण कोण आहोत अन् कसे आहोत ते.

५ कार्यसंस्कृती