पान:कार्यसंस्कृती.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छोटी सुरुवात...



 कार्यसंस्कृती ही गोष्ट अगदी आपल्या जगण्याशी निगडित आहे.
 जेव्हा पहिला माणूस दुसऱ्या माणसाबरोबर राहू- वागू लागला तेव्हापासून कार्यसंस्कृतीची सुरुवात झाली. कार्यसंस्कृतीची कथा फार जुनी आहे. लाखो वर्षांपूर्वीची. अगदी पहिल्यापासूनची.
 त्यात अर्थात फरक होत गेला. आपलं काम करण्याचं स्वरूप बदलत गेलं तशी आपली कार्यसंस्कृती बदलत गेली. जगण्याची व्यवस्था बदलली तसे कार्यसंस्कृतीचे आयाम बदलत गेले. तिची मूल्यं बदलली, तिचे आधार बदलले आणि स्वरूपही बदलत राहिलं.
 अगदी साधं आहे. सोपं आहे. संस्कृती म्हणजे आपल्या तत्त्वांचं, श्रद्धांचं प्रकटीकरण. कार्यसंस्कृती म्हणजे आपण काम का करायचं, कशासाठी करायचं आणि कसं करायचं ह्याचा सम्यक् विचार. आपल्या मूलभूत तत्त्वांचं आणि श्रद्धांचं कामातून होणारं दर्शन.
 त्यामुळेच कार्यसंस्कृती बाहेर कुठे असत नाही, दिसत नाही. ती आत, आपल्यात असते. आपल्यापासून सुरू होते अन् आपल्याभोवतीच राहते. घरात, कामाच्या ठिकाणी, बसस्टॉपवर, दुकानात आणि सार्वजनिक उत्सवात. जिथे आपण असतो, तिथे.