७२. छोटी-मोठी वर्तुळं
तिथं बरेचजण जमले होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले, वेगवेगळ्या स्तरांतले लोक.अगदी
छोट्या गावात राहून व्यवसाय करणारे काहीजण होते तर काहीजण व्यवसायाच्या क्षेत्रात बन्याच डिण्या घेतलेले, उच्चविद्याविभूषित.
आम्ही तीन दिवस एकत्र होतो, पण या तीन दिवसांत वेगवेगळे लोक एकमेकांत बोलतील,
मिसळतील, एकमेकांच्या ओळखी करून घेतील, अशी अपेक्षा होती.
पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही.
का बरं घडलं नाही? संयोजकांनी प्रयत्न करूनसुद्धा विचारांचं अभिसरण किंवा परस्परांत ओळखी-पाळखी का बरं होऊ शकल्या नाहीत?
लोकांनी घातलेले कपडे, बोलण्याची ढब किंवा शैक्षणिक-आर्थिक पार्श्वभूमी या गोष्टी तर आमच्यात दरी निर्माण करणाऱ्या होत्याच पण त्याहीपेक्षा एकमेकांमधलं प्रत्यक्ष शारीरिक अंतर म्हणजे एकमेकांपासून कमी - जास्त अंतरावर उभं राहणं, बसणं या गोष्टींनी देखील आम्ही छोट्या छोट्या गटात विभागत गेलो. एका मोठ्या वर्तुळाची छोटी छोटी वर्तुळं होत गेली. कपड्याबरहुकूम.सोयीप्रमाणं, प्रतिष्ठेप्रमाणं.
माणसाची मूळ प्रवृत्ती छोट्या वर्तुळात जाण्याचीच असते. प्रयत्नपूर्वक त्याला छेद द्यायला हवा हे मात्र खरं.