पान:कार्यशैली.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७०. कशासाठी?



 मंगेशचं आणि माझं एक विशिष्ट गणित आहे. तो आणि मी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असलो तरी एका प्रोजेक्टच्या आखणीमध्ये आम्हाला वारंवार भेटावं लागतं. त्यामुळं कधी तासाच्या, तर कधी अगदी अर्ध्या तासाच्या मीटिंग्ज आम्ही करतो.आम्ही नुसते कामात सहकारी आहोत असं नाही. आमच्या आवडी, आमचे छंदही सारखे आहेत. दोघांनाही पाश्चात्य संगीत आवडतं आणि भेटलो की आमचं काहीतरी बोलणं त्यावर होतंच.
 अर्थात असं असलं तरी आमच्या मीटिंग्जमध्ये एक शिस्त असते आणि त्याचं कारण एकच.ते म्हणजे मंगेशचा नेहमीचा, एक आवडता प्रश्न. तो नेहमी विचारतो आपण कशासाठी भेटतो आहोत,ते एका कागदावर लिहून आण.

 कशासाठी? या एकाच प्रश्नानं आमच्या अंगात एक आपसूक नेमकेपणा उतरतो.चर्चेला टोक येतं.चर्चेतला पसरटपणा निघून जातो. आपल्याला काय करायचं आहे ते लिहून काढल्यानं आणि तो कागद समोरच ठेवल्यानं लक्ष्य स्पष्ट असतं. आमचा वेळ कधीच वायफळ जात नाही.

९५। कार्यशैली