६९. धर्मग्रंथ
सध्या हे पुस्तक मी इतका कवटाळून बसलो आहे की ते पुस्तक माझा सध्याचा धर्मग्रंथ बनला
आहे. दिवसभराच्या धावपळीत आणि धांदलीत मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी ते पुस्तक वाचतो, चाळतो किंवा अगदीच वेळ नसेल तर नुसता हातात घेतो. सध्या असं झालंय की ते पुस्तक नुसतं हातात घेतलं तरी मला बरं वाटत आहे. माझा सध्याचा धर्मग्रंथ. उद्या आणखी महिन्याभरानं तो राहील की नाही ते माहीत नाही पण सध्याचा तरी तो माझा धर्मग्रंथ आहे. सध्या माझा जो धर्म आहे किंवा सध्या मी जे जगतो आहे. ज्यावर चालतो आहे त्या मार्गावर मला दिशा दाखवणारा तो धर्मग्रंथ.
तसे माझ्या आयुष्यात बरेच धर्मग्रंथ होऊन गेले. नुकतं वाचायला लागलो तेव्हाचा एक.नंतर मग शूर लढायांची वर्णनं असणारा, त्यानंतर थोडा रोमँटिक, नंतर राजकीय तत्त्वज्ञान असणारा. माझ्या त्यावेळच्या प्रवासात माझा धर्म सांगणारा ग्रंध म्हणजे धर्मग्रंथ.
तुम्हाला तुमचा सध्याचा धर्मग्रंथ आहे? कोणता बरं?