पान:कार्यशैली.pdf/८०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५७. कुठला भविष्यकाळ


 आदिवासी भागात काम करणाऱ्या माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की आदिवासी भाषेमध्ये, म्हणजे त्या तिथल्या आदिवासी भाषेमध्ये भविष्यकाळच नाही. भविष्यकाळच नाही म्हणजे तिथल्या व्याकरणात किंवा भाषेच्या प्रयोगात भविष्यकाळाचा वापरच नाही.
 सगळंच जगणं वर्तमानात किंवा फार तर भूतकाळात, पण भाषेला भविष्यकाळच माहीत नाही.
 मला वाटतं, आपलं काय वेगळं आहे? मी ज्या शहरात राहतो ते घाणीनं भरलेलं आहे.मोकळा, स्वच्छ आणि शुद्ध श्वास मला घेता येत नाही. रहदारी इतकी की सहज फिरायला जावं अशी परिस्थिती नाही. गाड्या चालवायलाच काय पण पार्किंगलासुद्धा जागा मिळत नाही. मुलं शाळेत जातात पण शिकत नाहीत. नळ आहे पण पाणी नाही. ज्या वयात मुलांनी खेळायचं त्या वयात मुलं काबाडकष्ट करतात.
 माझ्या देशाचं भविष्य शिकण्याऐवजी उन्हातान्हात राबत राहतं.

 माझ्याही भाषेतला भविष्यकाळ मला आता काढून टाकायला हवा. डोळ्यावर पट्टी बांधून आजच्या युगामध्ये रमायला हवं.

७९। कार्यशैली