२९. त्या दिवसाचा तुकडा
एखाद्या दिवशी वाटतं की त्या दिवसाचा एक तुकडा बाजूला काढून ठेवावा म्हणजे गरज वाटेल
तेव्हा त्याला पिशवीतून काढून उपयोगात आणता येईल.
प्रचंड उत्साहाचा, स्वच्छ, नितळ, आणि संपूर्ण समतोलाचा एक तुकडा. एका दिवसाचा. ऊर्जेच्या उदंड उधाणाचा त्या दिवसाचा तो मस्त, प्रसन्न दिवसाचा तुकडा.
समोर स्वच्छ उदात्त स्वप्न उभं. त्या स्वप्नाच्या दिशेनं चालणारे, ध्येयप्राप्तीच्या वाटेनं कूच करणारे अचूक प्रयत्न, त्या दिवसाचा नकाशा नेमका ठरलेला, स्वच्छ, रेखीव असा मार्ग आखलेला, लक्ष संपूर्ण एकाग्र, एकचित्त. फक्त समोरच्या कामाकडे.
बसण्या-उठण्यात, अन् बोलण्या-ऐकण्यात एकदम सहजता, मनस्विता, अंगात कुठंही कुठल्या पेशीमध्येही एवढसासुद्धा ताण नाही की अवघडलंपण नाही. डोळ्यात शीण नाही. हवेत जणू तरंगल्यासारखा हलकेपणा, कामातला श्रेष्ठतम आनंद, सगळ्या गोष्टीतलं शुद्ध संतुलन.
तो दिवस आजही स्पष्ट डोळ्यांसमोर येतो. एखाद्या कुपित ठेवण्यासारखा किंवा खजिन्यासारखा.जिथं मी काही व्यग्र आहे याचा कुठला त्रास तर नाहीच पण त्याहीपेक्षा प्रत्येक क्षणामधली अन् कृतीमधली अपार ऊर्जा मला आजही उजळवून टाकते.
४३। कार्यशैली