पान:कार्यशैली.pdf/४५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०. माहीत नाही



 'माहीत नाही' हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत, फार मार्गदर्शक आहेत आणि उच्चारायला अवघडदेखील आहेत. पण सांगू आपण ते शब्द मनापासून उच्चारायला सुरुवात केली आणि जे माहीत नाही ते माहीत नाही, असं म्हणायला सुरुवात केली की फार चांगले आणि ठोस बदल व्हायला सुरुवात होते. मनामध्ये, वृत्तीमध्ये आणि काम करण्याच्या शैलीमध्येदेखील.
 'माहीत नाही' दोनच साधे शब्द, पण एक प्रकारची वृत्ती दर्शवणारे.
 'माहीत नाही म्हटले की शोध सुरू राहतो, माहीत करून घेण्याची धडपड़ राहते.निवडणं- खुरपणं सुरू राहतं. व्यग्रता धारण केली जाते. नव्हे करावी लागते. मन मोकळं, खुलं. आणि नवं स्वीकारण्याची तयारी रहाते.
 'माहीत नाही' म्हणजे अज्ञान नव्हे, ती आहे प्रामाणिकता, सत्यता, 'माहीत नाही' म्हणजे जिज्ञासा, समज आणि संपूर्णता कुठलीही गोष्ट पूर्ण आणि सर्वस्वी माहीत नसतेच, माहीत असतं ते त्याचं फक्त प्रोफाईल.

 जेव्हा माहीत नसतं तेव्हा 'माहीत नाही म्हणायला आलं पाहिजे. तसं आलं म्हणजे अनेक प्रकारची गुंतागुंत टाळता येईल. शुद्ध, स्वच्छ आणि खुली कार्यशैली अंगीकारता येईल.

कार्यशैली। ४४