पान:कविता गजाआडच्या.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना


 एकविसाव्या शतकात प्रवेश करीत असताना मराठी मध्ये स्त्रियांची साहित्य निर्मिती ही नवलाईची बाब राहिलेली नाही. कविता तर मराठीच्या जन्माच्या आधी पासून प्राकृत-अपभ्रंशापासून स्त्रिया रचित आल्या आहेत. गात आल्या आहेत.
 मराठीतील आदिकवी मुकुंदराज- ज्ञानदेवांच्या ओवीच्या आधीपासून महाराष्ट्रातली तान्ही बाळं आई, आजीच्या ओव्या ऐकत मोठी झाली आहेत. पाठोपाठ संतसज्जनांच्या भक्तीमेळ्यातील अभंग-ओवीला जन्मापासून मुक्तपणे स्त्रियांनी मनी-मुखी घोळविले आहे. मुक्ता-जना बाईंनी ज्ञानदेव-नामदेवाबरोबर निर्मिती केली आहे. 'तंत कवींची शाहिरी सोडता त्याच्या आगेमागेच्या सर्व तऱ्हेच्या कवितानिर्मितीत स्त्रीचा सहभाग मोठा आहे.
 लावणीतील उघड्या शृगांराच्या वर्णनाची अमर्यादा घरंदाज स्त्री कवयित्रींनी न करणे स्वाभाविकच होते. उघड उघड रणातला हिंसाचार आणि हार-जितीची उग्रता ही तिच्या पिंडाला मानवणारी नसल्याने तिने पोवाडे गायिले नाहीत. पण भक्तीचे आणि प्रपंचातल्या हर्ष विमर्शांचे 'पवाड' मात्र मुक्तपणे गायिले आहेत. पांडित्य मिरवणे आणि त्यासाठी संस्कृतप्रचुर भाषेच्या अनवट वाटा तुडवणे हे तिच्या 'प्रकृती'ला न मानवणारे आणि तशी संधी उपलब्ध न होऊ देणे हे ही त्या काळी स्वाभाविकच ठरले. एरव्ही मात्र स्त्री ची कविता मराठीच्या वाहणीसह सतत वाहत आली. सर्व वळणा-वाकणातून जात आली. अक्षरे लिहायची मुभा नव्हती तेव्हा पिढ्यान् पिढ्या मौखिक-वारशाने प्रवाहित झाली. अक्षरे शिकण्याची मुभा आणि संधी मिळाली तेव्हापासून बाईची कविताही साक्षर झाली आणि छपाईच्या कलेसोबत छापलीही जाऊ लागली. कवितेबरोबरच गद्याचा प्रपंचही 'साक्षर' स्त्री ने संधीनुसार प्रारंभापासूनच उभा केला आहे.
 एकोणीसाव्या शतकातल्या इंग्रजोत्तर बदलत्या मनुबरोबर स्त्री शिक्षणाची संकल्पनाही बदलली- नवे शिक्षण घेऊन स्त्री साक्षर झालीच पण नव्या युगाच्या विचारातून तिच्या आविष्काराला नवे धुमारेही फुटले. प्रारंभीच्या काळातील नवजागृत उदारमतवादी पुरुषांनी बाईला अक्षरओळखी बरोबरच उंबरठ्याबाहेरच्या जगाची ओळख करून देण्यात पुढाकार घेतला. तिच्या शतकानुशतकांच्या एका लहान बिंदूत अडकलेल्या मन-बुद्धीचा परीघ विस्तृत करण्यासाठी सर्व परींनी सहकार्य केले. त्याचाच परिणाम म्हणून स्त्री अक्षरातून अधिक व्यक्त होऊ लागली. कवितेबरोबरच निबंध, कथा, पुढे कादंबरी, आत्मकथन,